मुंबई : आज मुंबईत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. 1936 साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सांगितली. सार्वजनिक जीवनात वावरत असताना यश-अपयश हे येत असते. मात्र या साऱ्यातून उठून उभे राहण्याची ऊर्जा जर मला कोणाकडून मिळाली असेल तर माझ्या आईकडून आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसांकडून मिळाली आहे, असे पवार यावेळी म्हणाले.


80 लाख रुपयांचा निधी जमा
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 80 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला गेला आहे. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने बळीराजासाठी मदत दिली आहे. ही रक्कम राष्ट्रवादी वेलफेअर फंड मध्ये जाणार आहे. आज आत्महत्या, कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. हा निधी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल. संकटात सापडलेली असंख्य कुटुंबं आपल्याला उभी करायची आहेत. तुम्ही दिलेल्या बळीराजा कृतज्ञता कोषाचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो आणि आपले आभार व्यक्त करतो, असे शरद पवार यावेळी म्हणाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.



आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर 12 डिसेंबर याच दिवशी माझ्या मातोश्रींचाही जन्म झाला म्हणून! 13 डिसेंबर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस, तसेच याच आसपास माझ्या अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो, असे पवार म्हणाले.

हे ही वाचा - शरद पवारांचा असाही एक कार्यकर्ता, 22 वर्षांपासून 310 किमीवरुन शुभेच्छा द्यायला येतात हे आजोबा

माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या, तर वडील नोकरी करायचे. शेतीत जे काही पिकत असे, ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही करायचे. त्या काळातही आमच्या मातोश्रींच्या विचारांची झेप मोठी होती. त्या लोकल बोर्डावर काम करत होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा या विचाराने भारावलेल्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या सदैव आग्रही असत. मातोश्रींच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज आम्ही सारे कार्य करत आहोत, असेही पवार म्हणाले.

आपण ज्या माणसांच्या परिवर्तनासाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी लढतोय त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतंही संकट आपण पार करू शकतो. त्यामुळेच मी माझ्या सहकाऱ्यांनी नेहमी सांगत असतो की आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्याही उपयोगाला यायला हवं, असे पवार यावेळी म्हणाले.