बारामती : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने त्यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सत्कार देखील करण्यात आला. आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामती आणि मुंबईला पोहोचतात. या कार्यकर्त्यामध्ये एक कार्यकर्ता असा आहे जो गेली 22 वर्ष अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचत आहे. हा कार्यकर्ता म्हणजे निलंगा येथील 64 वर्षीय अब्दुल गणी खडके हे आजोबा. तब्बल 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी हे 310 किमी अंतर सायकलवरून प्रवास करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आगळावेगळा उपक्रम ते राबवत आहेत. एकीकडे निष्ठा संपत चाललेली असताना अब्दुल गणी खडके यांनी आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवून देत आहेत.


12 डिसेंबर रोजी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल तीनशे किलोमीटर सायकल प्रवास करत आहेत. तेही सायकलवरून..शरद पवार यांची जन्मभूमी असलेल्या काटेवाडीत येऊन ते शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करतात. शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केलंय ते न विसरता येणारं आहे. त्यामुळंच आपण या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचे अब्दुल गणी खडके सांगतात.



पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा 
दुसरीकडे आज मुंबईत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. 1936 साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली.
शरद पवारांचा असाही एक कार्यकर्ता, 22 वर्षांपासून 310 किमीवरुन शुभेच्छा द्यायला येतात हे आजोबा

सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस आहे असेही शरद पवार म्हणाले. आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.