शक्तिपीठ विरोध नव्याने एल्गार, ऑनलाइन मीटिंगमध्ये आजी-माजी नेते एकवटले; तिरंगा फडकतो आमच्या शेतात, महामार्ग नको वावरात'चा निर्धार
Shaktipeeth Expressway: "तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात" अशा आशयाने शक्तिपीठ महामार्गाला नव्याने जोरदार विरोध करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Shaktipeeth Expressway: "तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात" अशा आशयाने शक्तिपीठ महामार्गाला नव्याने जोरदार विरोध करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नुकतीच एक खास ऑनलाइन मीटिंग पार पडली असून त्यामध्ये आजी-माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते.विशेष म्हणजे प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या ऑनलाईन बैठकीत हजेरी लावल्याची माहिती आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून (Independence Day 2025) शक्तिपीठ महामार्गाला नव्या जोमाने विरोधाची मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावात ग्रामसभेत 15 ऑगस्ट रोजी महामार्ग विरोधी ठराव पारित करून घेण्याचे ठरले आहे.
कशी पार पडली ही ऑनलाईन बैठक?
-9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता ही खास ऑनलाईन बैठक पार पडली.
-या बैठकीत 12 जिल्ह्यातील राजकीय प्रतिनिधी यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
-त्यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आ. अरूण आण्णा लाड, आ. कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शक्तीपीठ -महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील अनेक राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
काय ठरले ऑनलाईन बैठकीत?
येत्या स्वातंत्र्य दिनापासून (Independence Day 2025) शक्तिपीठ महामार्गाला नव्या जोमाने विरोधाची मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावात ग्रामसभेत 15 ऑगस्ट रोजी महामार्ग विरोधी ठराव पारित करून घेण्याचे ठरले आहे. तसेच महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित केले जाणार आहे, त्या शेतांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकावून "तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात" अशा आशयाने विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कशी सुरु आहे?
12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 371 गावांमधील 8024 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी 7625 हेक्टर खाजगी जमीन म्हणजेच शेतकऱ्यांची जमीन असणार आहे. तर २६२ हेक्टर शासकीय आणि 123 हेक्टर वनक्षेत्राची जमीन असणार आहे. सध्या सर्व 12 जिल्ह्यांमध्ये मोजणीची प्रक्रिया सुरु आहे. महामार्गाच्या सुरुवातीच्या म्हणजेच वर्धा, यवतमाळ आणि अंतिम टोकावरील सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात संयुंक्त मोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. सोलापूरमध्ये ही मोजणीचे काम समाधानकारकरीत्या प्रगतीपथावर आहे. महामार्गाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड धाराशिव या जिल्ह्यात अल्प गतीने मोजणीचे काम सुरु आहे. तर लातूर, सांगली आणि खासकरून कोल्हापूरमध्ये शेत जमिनीच्या मोजणीच्या कामाला तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी मोजणी अत्यंत संथ गतीने सुरु आहे. अजून सरकार ने जमिनीसाठी किती मोबदला दिला जाईल त्याचे सूत्र जाहीर केलेले नाही.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता विरोधकांनी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा आणि राष्ट्रीय ध्वजाचा वापर करण्याचे ठरविल्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा नवा सूर उभा होता असल्याचा चित्र आहे. दरम्यान समर्थक शेतकरी ही खासकरून विदर्भ आणि मराठवाड्याच्या अपेक्षित विकासाचा मुद्दा समोर करून सक्रिय आहेत. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी खरंच किती ठिकाणी विरोधाचा स्वर बुलंद होतो, किती ग्रामसभांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात बहुमतांनी ठराव मंजूर होतात, हे 15 ऑगस्ट रोजी स्पष्ट होईल.
इतर महत्वाच्या बातम्या























