पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यामध्ये सात उमेदवार घोषित करण्यात आले असले, तरी बारामतीनंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार घोषित केलेला नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत सातारमध्ये कोणालाच उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सातारमध्ये उमेदवार घोषित तरी कधी होणार? अशी चर्चा रंगली असतानाच आता शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
सातारा आणि माढामध्ये एक ते दोन दिवसांमध्ये उमेदवार घोषित करणार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आमच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया अनौपचारिकपणे बोलताना शरद पवार यांनी दिली आहे. आज (5 एप्रिल) त्यांनी पुण्यामध्ये बोलताना सांगितले की, सातारा जागेसंदर्भात निर्णय झाला असून सातारा आणि माढा या दोन्ही ठिकाणी उमेदवार एक ते दोन दिवसांमध्ये घोषित करणार आहोत. सातारची जागा आम्ही सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
तुतारी हातामध्ये घेणार का?
भिवंडीची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे भिवंडीच्या बदल्यात सातारची जागा काँग्रेसला सुटते का? अशी चर्चा होती. मात्र, शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्याने तो निर्णय मावळल्यात जमा आहे. सांगलीतील जागेवरून बोलताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मित्र पक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केल्याचे ते म्हणाले. परंतु, आता बदल होईल असं वाटत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
भिवंडीच्या जागेवर बोलताना शरद पवार यांनी इतरांशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण लोकसभेमध्ये जाण्याची इच्छूक असले, तरी ते तुतारी हातामध्ये घेणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची निवासस्थानी जाऊन जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार गटाकडून पृथ्वीराज चव्हाण यांना सातारमधून लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी लढण्याची तयारी दर्शवली असली तरी, त्यांनी काँग्रेसच्या चिन्हाला लढणार असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार गटाकडून सातारपर्यंत आतापर्यंत चार नावांची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्त होणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. सत्यजित पाटणकर आणि सुनील माने यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा शरद पवार यांची तीनवेळा भेट घेत आपण कसे सातारा लोकसभेसाठी योग्य आहोत हे समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा पर्याय मागे पडल्यास शशिकांत शिंदे यांच्या नावावर शरद पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या