सातारा : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित युवकाने नर्तिकेच्या नादात स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेनं सोलापूरसह बीड जिल्हाही हादरला होता. कारण, बीड जिल्ह्यातील गेवराईच्या एका गावचा माजी उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गेने पूजा गायकवाड (Pooja gaikwad) हिच्या नादात जीव दिला, आपलं कुटुंब पोरकं गेलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, तसेच पूजा गायकवाडला नेटीझन्स आणि गोविंद बर्गेच्या ग्रामस्थांकडून लक्ष्य करण्यात आलं. गोविंदच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटकही करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे राज्यात गावखेड्यात सुरू असलेल्या कला केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील वेश्याव्यवसाय आणि अवैध धंद्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, कला केंद्र आणि तमाशा (Tamasha) यातील फरक सांगत तमाशा कलावंत मंगला बनसोडे (Mangala bansode) यांनी आम्हाला बदनाम करू नका, अशी खंत व्यक्त केलीय.
सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते आजपर्यंत हजारो रसिकांसमोर मी कला सादर केली. त्यावेळी रसिकांनी देखील आम्हाला न्याय दिला, आमच्यावर प्रेम केलं. त्यामुळेच मला आणि माझ्या आईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, असे परखड मत तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी मांडले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कला केंद्रातील नर्तिकेच्या वेडापायी गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे. त्यामध्ये, नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड आणि कला केंद्रावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तमाशा आणि कला केंद्र यातील फरक मंगला बनसोडे यांनी सांगितला आहे.
कला केंद्र आणि तमाशा हे वेगळे आहेत, कला केंद्रामुळे आमचा तमाशा बदनामी करू नये, असे आवाहन देखील मंगला बनसोडे यांनी केले आहे. तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. तमाशामध्ये लोककला, समाज प्रबोधन हे कलाकार हजारो प्रेक्षकांसमोर दाखवत असतात. त्यामुळेच, शासनासह रसिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कला केंद्र ही वेगळी बाजू आहे आणि लोकनाट्य कला म्हणजेच तमाशा ही वेगळी बाजू आहे, असे म्हणत पारगावच्या कला केंद्रातील घटनेनंतर तमाशाला बदनाम केलं जात असल्याची खंत लोकनाट्य कलाकार मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.