सांगली: भारताच्या निवडणूक आयोगावर (Election Commission of India) किती विश्वास ठेवायचा, हा एक गंभीर विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे. कुठलीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकतेय. निवडणूक आयोगांने माती खाल्ली आहे. निवडणूक आयोग नरेंद्र मोदींच्या पगडीत गुदमरला असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केली आहे. 


ईव्हीएम यंत्रणा, आचार संहिता प्रकरण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीवर दिलेल्या निर्णयानंतर आता एक गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. काही भागात सहा ते सात टक्के मतदानात अचानक वाढ झाल्याचं समोर आले. हे खूप धक्कादाक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आज सांगलीत संजय राऊतांनी माध्यमांसोबत संवाद साधला


संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 


पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या अकरा दिवसांनंतर आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या तिसऱ्या दिवसानंतर निवडणूक आयोगाने आकडे जाहीर केले आहेत. ते साधारण सर्व मतदार संघामध्ये सहा ते सात मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचं संजय राऊतांनी सांगितले. नांदेडमध्ये मतदान संपलं, तेव्हा 52 टक्के मतदान झालं होतं, हे निवडणूक आयोगाचेच आकडे आहेत. त्यात अर्धा किंवाएक टक्के फरक असू शकतो. मात्र आता 52 टक्क्याचं 62 टक्के कसं होऊ शकतं?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. देशभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढलेलं मतदान कोणी केलं?, हे खूप धक्कादायक आहे. मतदानाची टक्केवारी जाहीर करायला 11 दिवस का लागले?, हे डिजीटल इंडिया आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.


राऊतांची विशाल पाटलांवरही निशाणा-


संजय राऊत यांची विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर पुन्हा टीका आहे. सांगलीमध्ये  (Sangli Lok Sabha Election) भाजपाचे दोन उमेदवार उभे आहेत; एक काका (संजयकाका पाटील) आणि दुसरे दादा...(विशाल पाटील) दोन्ही उमेदवारांना भाजपाला रसद पुरवायची असेल तर भाजपने पुरवावी. काका आणि दादाच्या प्रचारासाठी काल योगी आले होते, पुन्हा भोगी येतील, अशी टीका संजय राऊतांनी केली. 


सांगलीत तिरंगी लढत


सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे.  सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. मात्र, त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. संजयकाका पाटील, गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती. 


विशाल पाटील यांनी पक्षनेतृत्त्वाची सूचना धुडकावली   


सांगलीचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  काँग्रेस हायकमांड आज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याची माहिती आहे. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची हायकमांडनं सूचना केली होती. काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार असल्यानं लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातमी:


Vishal Patil : सांगलीच्या रणांगणात नवा ट्विस्ट, विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार, काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता