मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये (MVA Seat Sharing) सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Election) शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडे गेला. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळं काँग्रेसमधून (Congress) लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी वेगळा निर्णय घेतला. काँग्रेसला ही जागा न सुटल्यानं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आता सांगलीची लढत तिरंगी होत आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 


विशाल पाटील हे सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते असून प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही सांगलीची  जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. यामुळं विशाल पाटील यांोनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेतृत्त्वाला विशाल पाटील यांची समजूत काढण्यात अपयश आलं. त्यामुळं उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 


विशाल पाटील यांनी पक्षनेतृत्त्वाची सूचना धुडकावली   


सांगलीचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  काँग्रेस हायकमांड आज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याची माहिती आहे. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची हायकमांडनं सूचना केली होती. काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार असल्यानं लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 


सांगलीत तिरंगी लढत


सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे.  सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. मात्र, त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. संजयकाका पाटील, गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती. 
 


संबंधित बातम्या :