Jayant Patil : शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात येत असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कुणाकडे याकडे खरे शिवसैनिक वाट पाहत असले, तरी उद्धव ठाकरे कुणाकडे हे महत्वाचे आहे. खरे शिवसैनिक उद्धव यांच्या मागे थांबतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते बाळासाहेबांची परंपरा चालवत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आज झालेल्या अवघ्या 10 मिनिटांच्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा तारीख देण्यात आली असून आता सुनावणी 20 दिवसांनी पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले. महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावर कोर्टाने आणखी 2 महिने वेळ घेतला, तर तो वेळकाढूपणा ठरेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पण बारामती शरद पवारांना सोडणार नाही
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती दौरा आणि बारामती लोकसभेच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावर आणि भाजपच्या अजेंड्यावर जयंत पाटील यांनी टीका केली. बावनकुळेंना भाजपने विधानसभा तिकीट नाकारले होते, त्याची चर्चा आम्हाला करायचची नाही. बावनकुळेंना शरद पवारांवर बोलणे शोभत नाही. एकवेळ सूर्य पश्चिमकडे उगवेल, पण बारामती शरद पवाराना सोडणार नाही, एवढे घट्ट नाते पवारांचे बारामतीशी आहे असल्याचे ते म्हणाले.
एखाद्याचा अश्वमेध रोखल्याचा जो त्रास होतो तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होतो. बारामतीची जनता आम्हाला चांगली माहिती आहे; कुणीही आलं, तरी सुप्रिया सुळे यांना 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळते आणि अजित दादांनाही 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळते. सगळ्यात मोठ्या नेत्याला आम्ही आव्हान देतो हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे बारामतीचे उदाहरण आहे. आमच्याही पक्षाचा प्लॅन मी लवकरच मांडेन, त्यावेळी आम्ही कुणाकुणाला टार्गेट करतोय ते लवकरच तुम्हाला कळेल.
भाजप आज सगळीकडे सत्तेत आहे, लोकांची कामे करायचे सोडून अशा पध्दतीने आव्हान देण्याचं काम भाजपकडून केले जातेय याचा अर्थ भाजपची लोकप्रियता कमी होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या