Satara Crime : सातारा जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा थेट एटीएममध्ये ब्लास्ट करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री सातारा तालुक्यातील नागठाणेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीन ब्लास्ट करून फोडण्यात आले. चोरट्यांनी नेमक्या किती रकमेवर डल्ला मारला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. एटीएम फोडण्यासाठी जिलेटीन ब्लास्ट केला जात असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.


सातारा तालुक्यातील नागठाणेमध्ये ATM मध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी ATM मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून व्हिजिटीबिलिटी बंद केली. त्यानंतर त्यांनी जिलेटीन कांड्यांचा वापर करत एटीएम फोडले आणि रोकड घेऊन फरार झाले. आरोपींनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारून व्हिजिटीबिलिटी कमी करतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 


एटीएम लुटल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांचे तपास पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर एटीएम फोडण्यासाठी  जिलेटीन ब्लास्ट केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी बोरगाव पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवला आहे. दरम्यान, चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याबाबत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे.  


दोन महिन्यात दुसरी घटना 


यापूर्वी सातार जिल्ह्यामधील कराड तालुक्यात ATM मध्ये जिलेटिन ब्लास्ट करून लुटण्याचा प्रयत्न केला होता. कराडमध्ये गजानन हौसिंग सोसायटीत रस्त्याकडेला असलेल्या इमारतीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला होता. 


बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने एक चोराला पकडण्यात यश आले, तर तिघे फरार झाले. यावेळी चोरटे व पोलीस यांच्यात झटापट झाल. याच झटापटीत एकाने पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे फवारल्याने काही पोलिस जखमी झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या