Sangli News : ओमान (Oman) देशातील समुद्रात सांगलीतील (Sangli) तीन जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. समुद्रात बेपत्ता झालेले तीन जण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रहिवासी आहेत. अभियंता शशिकांत म्हमाणे आणि त्यांची दोन मुले ओमानमधील लाटांच्या तडाख्यात वाहून गेले. या घटनेने जतमध्ये शोककळा पसरली आहे. 


वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी 12 जुलै रोजी घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे. 


मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबईजवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावेळी ही घटना घडली आहे. मग ते ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले, तिथे प्रचंड लाटा होत्या. त्याचा व्हिडीओ शूट करतानाच मोठी लाट आली आणि त्यात काही जण ओढले गेले.


या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे समुद्रात बेपत्ता झाले. तर त्यांच्या पत्नी सारिका आणि एका मुलीची सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शशिकांत म्हमाणे यांचे बंधू तात्काळ दुबईला गेल्याची कुटुंबीयांनी सांगितलं. परंतु आनंद लुटण्यासाठी म्हणून समुद्रकिनारी गेलेल्या या कुटुंबावर काळाने घात केला. या घटनेमुळे कुटुंबावर आणि मूळ गाव जतमध्ये शोककळा पसरली आहे