Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडीत श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरीत आयोजित केलेल्या दोनदिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झाली. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाची सांगता झाली. 


राम नाईक आणि राजीव खांडेकर यांना मानपत्र प्रदान


संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात राम नाईक आणि राजीव खांडेकर यांनी डॉ. शंकरराव खरात यांच्या संघर्षातून निर्माण झालेले साहित्य आणि त्यांच्या एकूण कार्याला उजाळा दिला. यावेळी राम नाईक आणि राजीव खांडेकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी खरात यांच्या स्मारकासाठी एक एकर जागा दिल्याबद्दल राम नाईक आणि राजीव खांडेकर यांनी त्यांचे कौतुक केले आणि स्मारक आणि तालुक्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली. सांगता समारोपात काही ठराव देखील मंजूर करण्यात आले. 


सांगता समारोपात काही ठराव देखील मंजूर


ज्यामध्ये शंकरराव खरात यांचे स्मारक उभारावे, कृषी विद्यापीठ स्थापन करावे, खरात यांचे साहित्य शासनाने प्रसिद्ध करावे आणि अभ्यासक्रमात ते समाविष्ट करावे, टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाइपलाइन मार्फत द्यावे आणि त्याची आवर्तन निश्चित करावीत, ५३ गावांची धनगाव योजना पूर्ण करावी, आटपाडी तालुक्याला रेल्वेने जोडले जावे, असे ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.


आटपाडीच्या वेशीबाहेर जन्मलेल्या डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्य नगरी उभारून साहित्य संमेलन भरतयं हे सामाजिक उन्नतीचे उदाहरण आटपाडी आणि राज्याने पाहिले असेल असं मला वाटत नाही. हा वसा संमेलनातून परतताना घेतला पाहिजे असे प्रतिपादन उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय नेते राम नाईक यांनी केले. शंकरराव खरात यांनी आपल्या आत्मचरित्रातून त्यांच्यावर आणि दलित समाजावर झालेला अन्याय व्यक्त करताना वाचकाला प्रेरणा दिली. शाळेबाहेर उभा राहून धडे घेणारा माणूस एका विद्यापीठाचा कुलगुरू होतो ही माझ्या दृष्टीने अभिमानाची घटना आहे. 


दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत चीड,संताप व्यक्त करतानाही त्यात वाचकालाही प्रेरणा देऊन जाणारे साहित्य डॉ.शंकरराव खरात यांनी निर्माण केले असून संपूर्ण समाजाचा ध्यास घेतलेले शंकरराव खरात यांच्या साहित्य संमेलनातून सर्वांनी सामाजिक उन्नतीचा वसा घ्यावा असे उद्गार राम नाईक यांनी काढले.


तर राजकारणाची दिशा बदलली असती


शंकरराव खरात यांना राजकारणात संधी मिळाली असती, तर राजकारणाची दिशा बदलली असती. शंकरराव खरात यांच्यावर सर्वांनी अन्याय केला. दलित साहित्यातील लिखाण डोळ्यात अश्रू उभे करायचे. साध्या आणि सोप्या प्रभावी भाषेतील त्यांच्या लिखाणाचे चीज समीक्षक आणि समाजाने केले नाही. त्यांना मिळालेल्या सर्व भूमिकांना त्यांनी न्याय दिला. डॉ.शंकरराव खरात यांनी दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, शासनाकडून व समाजाकडून त्याच्या कार्याची त्यावेळी दखल घेतली गेली नाही अशी खंत व्यक्त केली. डॉ.शंकरराव खरात यांच्या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या मंडळींची पुढची पिढी त्याच्या नावाने होत असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असल्याचा अभिमान आहे.साहित्याच्या समीक्षक व समाजाने त्याच्या साहित्याची दखल घेतली गेली नाही.


डॉ.शंकरराव खरात याचे आटपाडीत उभारणारे स्मारक हे महाराष्ट्रासह देशभरातील नव्हे, तर जगातील लोक बघण्यासाठी यावेत असे स्मारक उभे रहावे यासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.