Sangli News : एकवेळ आमदार होता येईल, पण गावचा सरपंच (Sarpanch Election) होता येणार नाही असे नेहमीच उपहासात्मक म्हटले जाते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत झालेली लाखांची उड्डाणे पाहून याची पुन्हा एकदा प्रचिती आली. थेट जनतेतून निवड असल्याने आजी माजी आमदारांनी तसेच नेत्यांनी गावच्या 'वजनदार' उमेदवारांच्या पाठिशी गट मजबूत करण्यासाठी आपली ताकद लावली होती. तसेच सरपंचपदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.
आता या सर्वावर कडी होईल अशी एक घटना सांगली (Sangli News) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात घडली. तालुक्यातील वंजारवाडीच्या लोकनियुक्त सरपंच अरुण खरमाटे यांनी थेट शपथविधी सोहळा (Sarpanch took the oath in sangli) आयोजित करून सर्वांनाच चकित केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने राज्यपालांकडून शपथ दिली जाते. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी शपथविधी सोहळा गावात आयोजित केला. त्यांनी बीडीओच्या उपस्थितीत शपथ घेतली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी सोहळे पार पडतात तसेच सरपंचपदाचा पदभार आणि शपथविधी सोहळ्याचे त्यांनी नेटके नियोजन केले. त्यामुळे जे गावचे सरपंच झाले त्यांना आपण गावचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटू लागलं आहे. एकूण 1300 लोकसंख्या असलेले गाव आहे.
वंजारवाडीचे लोकनियुक्त सरपंच अरुण अंतू खरमाटे यांच्यासह उपसरपंच म्हणून बाजीराव खरमाटे यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सुरेखा खरमाटे, तेजस्वीनी खरमाटे, उमेश महादेव खोत, दत्तात्रय मारुती चवदार, आकाश ललिता नारायण खरात, मोनिका किरण खरमाटे, प्रियांका महादेव केंगार, सुशीला सुखदेव गुळीक यांनी शपथ घेतली.
विरोधकांनी उताऱ्यात लिंबू पुरले अन् सत्ताधाऱ्यांनी निवडून येताच गाडीखाली चिरडले!
शपथविधी सोहळा चर्चेत असतानाच ग्रामपंचायत निकालादिवशीसुद्धा सांगली जिल्ह्यातील एका घटनेची चांगलीच चर्चा झाली होती. कवठेमंहाकाळ तालुक्यातील चुडेखिंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार समोर आला होता. मतदानापूर्वी विरोधकांकडून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी लिंबू पुरण्याचा प्रकार चुडेखिंडीत झाला. मात्र, प्रत्यक्षात मतमोजणीनंतर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
या प्रकारानंतर सरपंच बापूराव पाटील यांनी या प्रकारानंतर खुलासा केला होता. ते म्हणाले की, विरोधकांकडून भीती निर्माण करण्यासाठी असा प्रकार करण्यात आला होता. आमच्या बुथसमोर लिंबू, नारळ आणि बरंच काही पुरल्या होत्या. या प्रकारानंतर ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र, गावकऱ्यांनी लिंबूचं काही चालत नाही हे निकालातून दाखवून दिले. लिंबू नारळ पुरला, तरी काही होत नाही. या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर लिंबू टाकले व गाडीखाली चिरडले.
इतर महत्वाच्या बातम्या