Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बांबवडे येथील ऊसाच्या फडात मातेपासून दुरावलेली बिबट्याची तीन पिले (leopard cubs) बुधवारी मध्यरात्री मादीने नैसर्गिक अधिवासात नेल्यानंतर पिलांची घरवापसी मोहीम यशस्वी पार पडली. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या तीन पिलांना नुकसान होऊ नये, यासाठी वन विभागाने जागता पहारा ठेवला होता.


सुनील राऊत (रा. टाकवे) यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना मंगळवारी दुपारी ऊसतोड मजुरांना बिबट्याची तीन पिले आढळल्याची माहिती भानुदास माने यांनी दिली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 30 ते 35 दिवस वयाचे एक मादी जातीचे तर दोन नर जातीची अशी तीन पिले फडात आढळली होती. त्यांचे वजन दोन किलो, एक किलो 700 ग्रॅम आणि 1 किलो 400 ग्रॅम होते.  


परिसरावर कॅमेरातून नजर


वन क्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनपाल चंद्रकांत देशमुख, देवकी ताशीलदार, प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशूवैद्यकीय अधिकारी सतिशकुमार जाधव व शुभांगी अरगडे यांनी त्यांची तपासणी केली असता सर्व पिले सुरक्षित असल्याचे सांगितले. आईपासून दुरावलेल्या पिलांना घेण्यासाठी रात्री मादी येणार हे ओळखून पिलांना प्लास्टिकच्या बकेटमध्ये ठेवण्यात आले. आईच्या कुशीत ही पिले जावीत यासाठी या परिसरावर कॅमेरातून नजर ठेवण्यात आली. 


रात्रीच्या अंधारात पिलांच्या मागावर आलेल्या बिबट्या मादीने आपल्या जबड्यातून तीनही पिले नैसर्गिक अधिवासात नेली. त्यावेळी वन कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. बिबट्याच्या पिलाची नैसर्गिक आणि मातेच्या मदतीने घरवापसी व्हावी यासाठी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी उपवन संरक्षक नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्वी पार पाडली.


वाळवा तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू


दरम्यान, सांगली जिल्ह्यात दोन नर जातीच्या बिबट्यांचा (leopard) मृत्यू झाल्याचे डिसेंबर महिन्यात समोर आले होते. वाळवा तालुक्यातील कार्वे आणि इटकरे या दोन गावात बिबट्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या बिबटयाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेलं नाही. यापूर्वी दुचाकीवरून निघालेल्या युवकावर बिबट्याने झेप घेऊन हल्ला केल्याची घटना वाळवा तालुक्यातील तांबवे शिवारात 10 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती.


इतर महत्वाच्या बातम्या