Sunil Deshmukh : महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख (Sunil Deshmukh) यांचे निधन झाले. सुनील देशमुख हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीहून (Sangali News) अमेरिका गाठून कर्तृत्वाने गाजवणारा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 1970 च्या दशकात अमेरिकेत गेलेल्यांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख केला जात होता. सुनील देशमुख यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा (पूर्वाश्रमीच्या प्रतिभा टिळक) गिरीश, निशा आणि सुशील अशी तीन मुलं असून ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. 


मराठी भाषा, समाज व संस्कृती यांबद्दल त्यांना प्रेम व कळकळ होती. हे ऋण फेडण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी महाराष्ट्र फौंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन 1994 पासून महाराष्ट्र फौंडेशनचे मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरू केली. 1996 पासून सामाजिक कार्य पुरस्कार योजनेसाठीही त्यांनी तेवढ्याच रकमेची व्यवस्था केली. त्यातून ते महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींना ते आर्थिक सहाय्य करत. 


सुनील देशमुख यांचा सांगली ते फ्लोरिडा व्हाया मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. सांगलीमध्ये 1964 साली एस.एस.सी.परीक्षेत बोर्डात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागातून 1970 साली बी. केम. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले.


अमेरिकेमध्ये एम. एस. (केमिकल इंजिनिअरिंग), एम. बी. ए. या पदव्यांबरोबरच जे. डी. ही कायद्याची पदवीही त्यांनी मिळवली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. नंतर अमेरिकेतच कमॉडिटी ट्रेडर म्हणून वॉलस्ट्रीटवर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी व्यवसाय केला. व्यवसायात नेत्रदीपक मिळवणाऱ्या सुनील देशमुख यांना साहित्य व समाजसेवेत विशेष आस्था होती.  व्यवसायातून स्वेच्छेने निवृत्त झाल्यानंतर आठवड्यातील काही काळ सामाजिक कामासाठी दिला. 


'फुल वीक सॅल्यूट'चा सन्मान


सुनील देशमुख अमेरिकेत पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांत जुन्या 'सियारा क्लब' या संस्थेचे सक्रिय सभासद होते. सियारा क्लबमार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचे ते शिल्पकार आहेत. तसेच त्यासाठी करावयाच्या निधी संकलन समितीचे प्रमुख होते. देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दलत्यांना न्यूयॉर्कमधील 'टाइम स्क्वेअर'मध्ये श्रीमती हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत 'फुल वीक सॅल्यूट'चा सन्मान मिळाला होता. 


सुनिल देशमुख हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाठीराखे होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कामाविषयी त्यांना विशेष आदर होता. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांनी अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे त्यांची अनेक भाषणे तेथे आयोजित केली होती. दशकातील उत्कृष्ट कार्यकर्ता हा पुरस्कार डॉ दाभोलकरांना त्यांनी देऊन रुपये 10 लाखांची थैली दिली होती, दाभोलकरांनी हा पुरस्काराचा निधी महाराष्ट्र अंनिस ला दिला. तसेच महाराष्ट्र फौंडेशनचा पहिला समाजकार्य गौरव पुरस्कार त्यांनी अंनिसला दिला होता. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक सुनील देशमुख यांनी स्वखर्चाने महाराष्ट्रातील 12 हजार 500 शाळांना सुरू केले होते. सुनील देशमुखयांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विनम्र आदरांजली.
- राहुल थोरात, पूर्णवेळ कार्यकर्ता, अंनिस, सांगली


इतर महत्वाच्या बातम्या