Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यामधील समडोळी (Samdoli ZP Girl School) येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा राजवाड्याप्रमाणे सजली आहे. रुपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे. मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रुप देण्यात आले आहे. कोरोना काळात खुल्या वातावरणातील शिक्षणावर संक्रांत आली. अडचणींवर मात करत शिक्षणाचा प्रवाह सुरु ठेवण्याचा प्रयत्न झाला. आता त्यापुढे पाऊल टाकून आनंददायी शिक्षणासाठी पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रुप प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


शाळेत रंगकाम पूर्ण, चित्रे रेखाटण्याचे काम सुरु


शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती. तेथेच अत्याधुनिक साधने वापरुन गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरु आहे. मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले असून चित्रे रेखाटली जात आहेत. शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे. शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे. शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत. 


मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे म्हणतात..


मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांनी या अभिनव संकल्पनेबाबत बोलताना सांगितले की, परंपरने आपण शाळेत भित्तीचित्रे, तरंगचित्रे काढतो, काहीवेळी व्यक्तीचित्रे काढतो. अलिकडील काळात कार्टूनही काढतात. आम्ही कोरोना काळात शाळा बंद असल्याने वेगळा प्रयोग करताना गावातील घराघरात विद्यार्थ्यांची 24 ठिकाणी शाळा भरवली होती. तो उपक्रम यशस्वी झाला. मात्र, परतून शाळेत आल्यानंतर शाळेचं चित्र बदलून गेले होते. त्यामुळे सुशोभिकरणाचा विचार डोक्यात आला. मुळात राजवाडा असल्याने ऐतिहासिक रुप देण्याचा निर्णय घेतला. गाव पातळीवर सर्वांनी सहकार्य केले. ते काम सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या