Sangli News : सांगलीच्या (Sangli) कृष्णा नदीतील मासे मृत्युप्रकरणी (Fish death)  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. माशांच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरी प्रकल्पानंतर आता थेट वसंतदादा साखर कारखान्यावरही (Vasantdada sugar factory) कारवाई करण्यात आली आहे. साखर कारखाना बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आली आहे. कारखान्याचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिली.


पालिकेवर फौजदारी कारवाई का करु नये?


कृष्णा नदीत दूषित पाणी मिसळत असल्याने यामुळे प्रदूषण होत आहे. याबाबत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेला जबाबदार धरुन फौजदारी कारवाई का करु नये अशी नोटीसही प्रदूषण महामंडळाने महापालिकेला बजावली आहे. कृष्णा नदी प्रदूषणामुळे चार दिवसांपूर्वी लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला होता. याच्या चौकशीअंती जलप्रदूषणासाठी दत्त इंडिया साखर कारखाना आणि महापालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी सोमवारी प्रादेशिक कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.


पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने हजारो माशांचा मृत्यू 


वसंतदादा साखर कारखाना भाडे करारावर चालवणार्‍या दत्त इंडिया कारखान्याचे रसायनयुक्त पाणी वाहून नेणारी नलिका फुटल्याने दूषित पाणी शेरीनाल्यात मिसळल्याचे आढळून आले होते. तर महापालिकेचे सांडपाणीही शेरीनाल्यातून वाहत असल्याचे आढळले. दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळले आहे. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासणीवरुन स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आता दत्त इंडियाला कारखाना बंद करण्यासाठी वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणसह जलसंपदा विभागाला आज देण्यात आले. 


राजू शेट्टींची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात यांचिका


कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (National Green Tribunal) पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अ‍ॅड. असिम सरोदे (Adv. Asim Sarode) यांच्या मदतीने सोमवारी (13 मार्च 2023) याचिका दाखल केली. पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिवादी केलं आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अ‍ॅड.असिम सरोदे यांच्यासह अ‍ॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अ‍ॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sangli News : सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी; मृत मासे गोळा करण्यासाठी झुंबड