Sangli Tasgaon News: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत  युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. या घटनेबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेनं अवघा तालुका हादरला आहे. या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील अल्पवयीन युवक तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावातील आहे. त्याची मावशी तालुक्यातील दुसऱ्या एका गावात राहते. त्याचे मावशीकडे जाणे-येणे होते. मावशीच्या जवळपास संबंधित युवती राहत होती. यातून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. यातून त्या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.


दोघे जण दुचाकीवरून घरी परतत असताना अंदाज चुकला अन्


माहिती अशी मिळाली की,  मध्यरात्रीच्या सुमारास या प्रेमीयुगुलाची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी गावाबाहेर जाऊन निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघे जण दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. आणि अचानक रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले.


युवतीला पोहता येत नसल्यानं बुडून झाला मृत्यू


युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला आणि रात्री तो विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत तसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत .


तीन तासाचं रेस्क्यू ऑपरेशन 


या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशनमधून (Tasgaon police News) कळले असता भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि HERF रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे, अनिल कोळी यांनी त्या तरुणीचा मृतदेह आणि मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली. या घटनेबाबत पोलिस कसून तपास करत आहेत.  


ही बातमी देखील वाचा