सांगली : सांगलीच्या  तासगाव (Sangli Tasgaon)  तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.  या घटनेत  युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे. 


या घटनेतील अल्पवयीन युवक तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावातील आहे. त्याची मावशी तालुक्यातील दुसऱ्या एका गावात राहते. त्याचे मावशीकडे नेहमीच  जाणे-येणे सुरू असते. मावशीच्या जवळपास संबंधित युवती राहत होती. यातून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. सोमवारी मध्यरात्री या प्रेमीयुगुलाची भेट झाली. त्यांनी गावाबाहेर जाऊन एकांतात निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. 


अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघेजण दुचाकीवरून घरी परत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले. युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला. युवक रात्रीच विहिरीबाहेर आला. पण युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 


या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसांत संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथून माहिती मिळताच भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि H.E.R.F रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे, अनिल कोळी यांनी मृतदेह आणि मोटरसायकल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.


आंबोली घाटात  घातपात करणाऱ्याचा झाला घात


कराड येथील वीट भट्टी व्यावसायिक आणि कामगार पुरवणाऱ्या दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवघवीवरून झालेल्या वादानंतर हाणामारीत सुशांत खिल्लारे या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अरूण माने आणि तुषार पवार यांनी सुशांत याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटाची निवड केली. हे दोघे मृतदेह कारमध्ये घेऊन कराडवरून आंबोली घाटात पोहोचले. आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर संरक्षक कठड्यावर उभे राहिले. यावेळी सुशांतचा मृतदेह  खोल दरीत फेकला गेला. परंतु, तोल गेल्याने अरूण माने देखील खोल दरीमध्ये कोसळला. तुषार मात्र यातून बचावला. या घटनेनंतर तुषार याने मित्र माने याला हाका मारल्या. परंतु, सुशांत यांचा मृत्यू झाला.