सांगली : सांगलीतील (Sangli) जून महिन्यातील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स (Reliance Jewels) या सराफा दुकानावरील सशस्त्र दरोड्याप्रकरणी (Robbery) पहिली अटकेची कारवाई करण्यात सांगली पोलिसांना (Sangli Police) यश आलं आहे. अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय 25 वर्षे, रा. तारवान, जि. पाटणा, बिहार) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला ओदिशामधून अटक करण्यात आली आहे.
दहा दिवसांची पोलीस कोठडी
सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीचे धागेदोरे शोधून काढले आहेत. आता अंकुरप्रतापला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या दरोड्यातील टोळीतील अन्य सदस्यांची नावे देखील निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करु अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
भरदिवसा रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा
4 जून रोजी भर दुपारी सात ते आठ जणांच्या टोळीने मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करत पिस्तूलाच्या धाकाने दुकानातील तब्बल साडे सहा कोटींचे दागिने, महागडे हिरे, रोकड लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला होता. त्यानंतर दरोडेखोर टाटा सफारी (क्र. एमएच 04 ईटी 8894) या गाडीतून तसेच दोन दुचाकीवरुन ते पसार झाले होते.
चौदा नव्हे तर सहा कोटींचा दरोडा
14 कोटी नव्हे तर 6 कोटी रुपयांचा दरोडा पडल्याचं रिलायन्स ज्वेल्सने पोलिसांना सांगितलं आहे. हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचं रिलायन्स ज्वेल्सने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. सुरुवातीला रिलायन्स ज्वेल्सवरील दरोड्यात 14 कोटी 69 लाख 300 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याचं म्हटलं होतं. परंतु 'रिलायन्स'ने पोलिसांना दिलेल्या पत्रात हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचं म्हटलं होतं.
दरोडा पडला त्या दिवशी काय घडलं?
सांगलीतील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स हे भव्य शोरुम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. 4 जून रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान शोरुममध्ये कोणीही नव्हते. तसेच मिरजेला जाणारा रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद होता. दरोडेखोर आतमध्ये आल्यानंतर पोलीस असल्याचे सांगून सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले. तपास करणार असल्याचे सांगून सर्वजण एकत्र आल्यानंतर रिव्हॉल्वर बाहेर काढून त्यांच्यावर रोखले. त्यानंतर सर्वांचे हात आणि तोंड चिकटपट्टीने बांधले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही केली. दोन कर्मचाऱ्यांना दरडावून सर्व दागिने, रोकड पिशवीत भरण्यास सांगितलं. चांदीचे दागिने न घेता केवळ सोन्याचे दागिने, डायमंड्स आणि रोकड दरोडेखोरांनी घेतली.
हेही वाचा