Sangli Robbery : रिलायन्स ज्वेल्समध्ये भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोडामधील (Reliance Jewels Robbery) चार संशयित दरोडेखोरांचे रेखाचित्र सांगली पोलिसांकडून (Sangli Police) जारी करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या दरोड्यात 14 कोटी रुपयांच्या सोने-हिऱ्यांची लूट आणि 67 हजार रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटली होती. 


संशयितांची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करा, पोलीस उपाधीक्षांचं आवाहन


पोलिसांनी आतापर्यंत दरोडेखोरांनी वापरलेली कार जप्त केली आहे. आज या कारमधील वस्तूंचे नमुने कोल्हापूरच्या फॉरेन्सिक टीमकडून घेण्यात आले आहेत. याचबरोबर आज यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहेत. या रेखाचित्रातील संशयतांची माहिती कोणाला असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असे आवाहनही पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे. 


हैदराबादमधून सहा जण चौकशीसाठी ताब्यात


दरम्यान रिलायन्स ज्वेल्सवरील भरदिवसा सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसाच्या हाती प्राथमिक धागेदोरे हाती लागले असून हैदराबादमधून सहा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर ताब्यातील व्यक्तींकडून सांगलीतील दरोड्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची आशा पोलिसांना आहे. तसेच शनिवारी एका व्यक्तीने रिलायन्स ज्वेल्सची रेकी केल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. आरोपींनी मुंबईजवळून कारची तर दुचाकीची गुलबर्ग्यातून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झालं आहे.


रिलायन्स ज्वेल्सवर फिल्मीस्टाईलने दरोडा


सांगलीमध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेलर्स ज्वेल्सवर दरोडा पडला. दुकानावर भरदिवसा दरोडा टाकत तब्बल 14 कोटी दागिन्यांची लूट करुन दरोडेखोर कारमधून फरार झाले. या दरोड्याने व्यावसायिकांमध्ये थरकाप उडाला आहे. ज्या पद्धतीने सशस्त्र दरोडा टाकण्यात आला ती पद्धत पाहता हे दरोडेखोर अत्यंत सराईत आणि परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहेत.


रेकी करुनच सशस्त्र दरोडा टाकला  


सांगली-मिरज रोडवर रिलायन्स ज्वेल्सचे शोरुम आहे. या रोडवर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी शोरुममधील सर्व सोने आणि हिरे लुटले. दरोडेखोरांनी शोरुमची यापूर्वी पाहणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री केली होती. त्यामुळे चेहरे न झाकताच त्यांनी दरोडा टाकला. लूट केल्यानंतर कोणताही पुरावा राहू नये म्हणून सीसीटीव्ही डीव्हीआरही कर्मचाऱ्यांना सांगून काढून घेतला. या गडबडीत एक डीव्हीआर खाली पडून फुटल्याने ते तसेच सोडून दरोडेखोर पळाले.


VIDEO : Sangli Robbery : रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणी 4 संशयित दरोडेखोरांचे रेखाचित्र जारी