सांगली :  राजकीय कुरघोडी, सत्तासंघर्षाने राजकीय चिखल झालेल्या राज्यात एक दिलासादायक बाब घडली आहे. गावाचा कारभारी असलेल्या सरपंचाने ठरवलं तर काहीही करता येऊ शकते. याचा प्रत्यय सांगलीतील (Sangli) रेवणगावातील  ग्रामस्थांना येत आहे. पाणीटंचाईचे संकट दिसत असताना त्याने स्वत:ची शेत जमीन पडीक ठेवत गावाला स्वखर्चाने पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला आहे. 


दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली असताना सांगली जिल्ह्यातील रेवणगावाचे सरपंच आपली शेती पडीक ठेवून आणि स्वखर्चातून पाईपलाइन करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहे. रेवणगावात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावाला पाणी कुठून उपलब्ध करून द्यायचे असा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी गावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून गावाला देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी लाखभर रुपये खर्च करून शेतापासून गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाइन देखील बनवली आहे.


रेवणगाव हे खानापूर घाटमाथ्यावरील 1410 लोकसंख्या असलेले गाव आहे. सचिन मुळीक हे या गावचे विद्यमान सरपंच आहेत.  गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला. गावाला जलजीवनची योजना होती पण ती अपूर्ण आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच  शासनाकडे टँकरची कशी मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. गावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या चार एकर शेतातील पिकांना बोअरवेलचे पाणी शेत तळ्यात टाकून देत होते. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  हे पाहून शेवटी सरपंचाने मार्च महिन्यापासूनच शेतीला पाणी न देता आता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकी पर्यंत सरपंचाने लाखभर खर्च करून पाइपलाइन देखील केली. आज दिवसाला 70 हजार लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेऊन देत आहेत. 


आज गावाशेजारी असणाऱ्या तलावात देखील पाणी नाही. शेतातील पीक पावसाअभावी जळून जात आहे. यातच पिण्याच्या पाण्यासाठी जर वणवण करावी लागली असती. पण सरपंच मोठ्या मनाने आज गावची सहा महिन्यापासून तहान भागवत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंचाने स्वतःची शेती पडीक ठेऊन घेतली. त्यामुळे गावकरी आमचा सरपंच हा खऱ्या अर्थाने गावची काळजी घेणारा सरपंच असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. जर  टँकर सुरू झाला असता तर पाणी जास्त करून महिलांनाच आणावे लागते. त्यामुळे सरपंचानी पाणी दिल्यामुळे कोसो दूर जाऊन पाणी आणण्याचा त्रास कमी झाला असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे.