सांगली: सांगलीच्या (Sangli News) जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रमशाळेतील 169 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांना जेवणातील बासुंदीतून विषबाधा झाल्याची माहिती आहे. उलटी आणि मळमळीचा त्रास सुरु झाल्यानंतर मुलांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आणि धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांवर चार ठिकाणी उपचार
समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील विद्यार्थ्यांना रविवारी (27 ऑगस्ट) संध्याकाळी जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब अशी लक्षणं दिसून आली. या मुलांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आणि धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं.
विद्यार्थी वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जत ग्रामीण रुग्णालयात 81 विद्यार्थी, ग्रामीण रूग्णालय, माडग्याळ येथे 21, ग्रामीण रूग्णालय, कवठेमहांकाळ येथे 41 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, मिरज येथे 26 अशा एकूण 169 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. 24 तास विद्यार्थ्यांना वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या मुलांच्या उपचारावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दाखल विद्यार्थ्यांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयास भेट
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयास भेट दिली, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच, जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ येथील रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कसर ठेवू नये, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या.
घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना
दरम्यान, या घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना दिल्या आहेत. चौकशीअंती दोषींवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं.
खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना
जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहं प्रमुखांनी मुलांना आहार देताना आणि शिजवताना अत्यंत काळजीपूर्वक, सतर्क राहून स्वच्छ, पोषक, आरोग्यदायी आणि भेसळमुक्त आहार देण्याची खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रूग्णालय स्तरावर पथकं गठीत करून वसतिगृहं आणि आश्रमशाळेची नियमित तपासणी करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. वसतिगृहं आणि आश्रमशाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आहार देताना नेहमीच योग्य ती खबरदारी घ्यावी, यापुढे असा अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं.
हेही वाचा: