Sangli News : पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) येथील एसटी कर्मचाऱ्याच्या (ST Employee) पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलं. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली होती. अखेर या आंदोलनाची दखल घेत संबंधित एसटी कर्मचाऱ्याला आजची रजा मंजूर करण्यात आली आहे. तसंच पत्नीने आपलं आंदोलन देखील मागे घेतलं आहे.


विलास कदम हे 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवेत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी त्यांनी आगारप्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र सुटी नाकारल्याने पत्नी नलिनी कदम यांनी आगारप्रमुखांच्या केबिनबाहेर अंथरुण टाकून आंदोलन सुरु केलं होतं. आंदोलनाची माहिती मिळताच सांगलीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आटपाडी आगारात येऊन आंदोलक महिलेची भेट घेतली. आंदोलन थांबवण्याची विनंती केली. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांकडे चौकशीही केली.


यानंतर आगारप्रमुखांनी विलास कदम यांची आजची रजा तातडीने मंजूर केली. त्यानंतर त्यांच्या पत्नीने आंदोलन मागे घेतलं आणि त्या आपल्या घरी रवाना झाल्या आहेत.


काय आहे प्रकरण?


विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवा बजावत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. आजअखेर त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला बाहेरगावी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 मार्च आणि 13 मार्च अशा दोन दिवसाच्या रजेसाठी त्यांनी आगार प्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र एसटी प्रशासनाने त्यांना सुट्टी नाकारत त्यादिवशी आटपाडी-इचलकरंजी ही ड्युटी असल्याचे कारण दिले. रविवारी (12 मार्च) सकाळी चालक कदम आणि त्यांची पत्नी नलिनी कदम आटपाडी आगारामध्ये आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चालक कदम यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही माझी पत्नी असल्याचे सांगितले. यावेळी नलिनी कदम या एका झाडाखाली बसल्या होत्या. दरम्यान चालक कदम हे त्यांना दिलेली आटपाडी इचलकरंजी गाडी घेऊन सेवेवर गेले. सुरक्षारक्षक गेटवर कामात व्यस्त असताना नलिनी यांनी आगार प्रमुखांची केबिन गाठत बंद केबिनसमोर अंथरुण पांघरुण टाकत आंदोलन सुरु केले.  


या आंदोलनामुळे आगारामध्ये कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून होत असणाऱ्या अन्यायाची ही चर्चा रंगली होती. अनेक अधिकारी व कर्मचारी हे मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिकारी आपल्याच सोयीप्रमाणे कामावर येऊन कर्मचाऱ्यांवर आपली दादागिरी करतात. असाही आरोप कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत.


दरम्यान एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या आंदोलनाची चर्चा दिवसभर रंगली. यानंतर आगारप्रमुखांनी विलास कदम यांची आजची रजा तातडीने मंजूर केली. त्यानंतर त्यांच्या पत्नीने आंदोलन मागे घेतलं.