Jayant Patil On Abdul Sattar : कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतची कृषीमंत्र्यांची भाषा ही दिलासादायक नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषीमंत्री आणि महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते सांगलीच्या (Sangli) कासेगाव इथे बोलत होते. 


शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, असं बेजबाबदार वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


शेतकऱ्यांकडे सरकार कसं बघतंय हे कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा दिसलं : जयंत पाटील


शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नवीन नाहीत. त्या नेहमीच्याच आहेत, अशी जर भावना कृषीमंत्र्यांच्या मनात असतील, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार कसं बघतंय, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांची काळजी न घेणारे सरकार आहे. सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शेतकरी आत्महत्या थांबवल्या पाहिजे, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलं.


अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.


कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर यातील तीन शेतकरी खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सत्तार यांनी दिलेलं उत्तर संताप आणणारं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.  


सत्तार यांची यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्ये


दरम्यान अब्दुल सत्तार यापूर्वी देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यांना माफी देखील मागावी लागली होती. त्यातच आता शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरुन सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, आज सभागृहात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातमी


शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य