Sangli News: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांबाबत पूर्तता न झाल्यास कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा जत तालुक्यातील या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. दुष्काळी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात नसल्याचा आरोप करत पाणी संघर्ष समितीच्या वतीने आता पुन्हा आरपारची लढाई सुरू केली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे संपूर्ण टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातल्या तुबची बबलेश्वर योजनेतून सीमा भागातील गावांना पाणी देण्याबाबत पाऊल उचलावं, यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये तालुक्यातील दुष्काळग्रस्त त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. 


कोणत्याही एनओसीची वाट न बघता थेट कर्नाटकमध्ये जाण्याची भूमिका


राज्य सरकारला पाणी संघर्ष समितीच्या वतीने आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. आठ दिवसात राज्य सरकारकडून जर दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत धोरण घेतलं नाही, तर राज्य सरकारची कोणत्याही एनओसीची वाट न बघता थेट कर्नाटकमध्ये जाण्याची भूमिका पुन्हा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी आठ दिवसानंतर जत तालुक्यातल्या 80 गावांमध्ये पदयात्रा काढून गावागावात जागृती करत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कर्नाटकमध्ये जाण्याबाबतचा ठराव करण्यात येईल आणि कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याचा पाणी संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 


सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच जत,आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रामुख्याने कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतली जातात. परंतु, या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झालेला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणी देखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे,पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची उगवण खुंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यात आहे.


दुसरीकडे कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज या पूर्वेकडील तालुक्यात देखील भीषण परिस्थिती काही दिवसात निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही सूचना पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्याच्या घडीला 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होत आहे. तसेच सीमेवरील आठ गावातील वाड्या वस्त्यांमध्ये  टँकर सुरू करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या