Sangli News: कर्नाटकातील अलमट्टी धरणातून केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विसर्ग वाढवण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या पत्राला उत्तर देताना दिली आहे. सिद्धरामय्या यांनी पाटकर यांना पत्र पाठवले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकानेही त्यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. ही माहिती कृष्णा नदी महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक आणि निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी दिली.
तर कृष्णा खोऱ्यात महापुराची परिस्थिती गंभीर होऊ शकते
दिवाण आणि केंगार यांनी एका निवेदनात माहिती दिली आहे की, अलमट्टी धरणामध्ये पाणी साठवण्याची उंची आता पूर्ण म्हणजेच 519.55 मीटर गाठली गेली आहे. धरणात सध्या 122.32 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणामध्ये पाण्याची रोज 48 हजार 212 क्युसेक आवक सुरु आहे. मात्र धरणातून फक्त 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अजून पावसाळा पुढे आहे. 15 ते 20 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊ शकतो. पाऊस अचानक वाढला तर कृष्णा खोऱ्यात महापुराची परिस्थिती गंभीर होऊ शकते.
त्यामुळे आम्ही मेधा पाटकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिली आणि कर्नाटक सरकारशी त्यांनी संपर्क साधावा अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनी तातडीने सिद्धरामय्या यांना एक पत्र ई-मेलने पाठवले. त्या पत्राचे त्यांना लगेच उत्तरही आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकानेही त्यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर या संदर्भात कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली.
मार्गदर्शक तत्त्वानुसार धरणांचे परिचलन करण्यासाठी कटिबद्ध
निवेदनात माहिती देण्यात आली आहे की, सिद्धरामय्या यांनी पाटकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण अलमट्टी धरणाबाबत माहिती कळवली आहे आणि त्या धरणामध्ये आणखी पाणीसाठा राहिला तर किंवा त्यातून विसर्ग वाढवला नाही तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह कृष्णा खोऱ्यात महापुराचा धोका असल्याचेही आपण नमूद केले आहे. त्याची कर्नाटक शासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आम्ही केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धरणांचे परिचलन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच आंतरराज्य विषय सामंजस्याने आणि समन्वयाने सोडवण्याचा आमचा आग्रह असतो. त्यामुळे मी संबंधित विभागाला याबाबत तातडीने माहिती घेऊन अलमट्टी धरणामधून विसर्ग वाढवणे गरजेचे असेल तर तशी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात शासनाकडून यापुढेही वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाईल.
दिवाण आणि केंगार यांनी सांगितले की, पाटकर यांनी त्यांच्या अतिशय व्यग्र कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही केलेल्या विनंतीची तातडीने दखल घेतली आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी तातडीने संपर्क साधून त्यांना पत्रही पाठवले. त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी दूरध्वनीवरुन संपर्कही साधला. सिद्धरामय्या यांनीही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून त्या पत्राची तातडीने दखल घेऊन त्याबाबत कर्नाटक शासनाच्या संबंधित विभागांना सूचना दिल्याचेही कळवले. त्यामुळे नजीकच्या काळात पाऊस वाढला आणि कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा आणि अन्य धरणांमध्ये पाण्याची आवक जरी वाढली तरी अलमट्टीतून विसर्ग वाढवला जाईल अशी आम्हाला खात्री वाटते आहे. साहजिकच त्यामुळे महापुराचे संकट टाळता येईल.
इतर महत्वाच्या बातम्या