सांगली : ज्वेलर्सची उधारी मागितली म्हणून दोघांना सात जणांनी चाकू, खंजीरने भोकसून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात घडली. याबाबात आटपाडी पोलीस ठाण्यात सुरेश जयवंत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी फिर्यादी यांचे मित्र बाळासाहेब जगदाळे यांची बोलेरो गाडीची (एमएच-10-सीआर-0123) काच फोडून मोडतोड केली. जखमींवर आटपाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे.


सुरेश गायकवाड यांचे आटपाडीमध्ये शुभम ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानातून कोळे येथील एकाने पाच वर्षांपूर्वी सोने खरेदी केले होते. खरेदी केलेल्या सोन्याची काही रक्कम पाच वर्षे होऊन देखील देण्यात न आल्याने सुरेश गायकवाड हे गेल्या काही महिन्यांपासून उधारीवर नेलेल्या ग्राहकाकडे मागणी करत होते.


भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला


सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शेटफळेमध्ये राहत असणारे सुरेश गायकवाड यांच्या घरासमोर आरोपी रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर आणि अन्य अनोळखी तीन जणांनी ज्वेलर्सची राहिलेली उधारी देतो असा बहाना करून एकत्र आले होते. यावेळी सुरेश गायकवाड यांना पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावून चाकूने हातावर आणि पोटावर वार केले. यावेळी त्यांच्या गाडीवरील चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आली. तेथे असणारा हेमंत गायकवाड हा भांडणे सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तसेच, लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. फिर्यादी सुरेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 


पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाची आत्महत्या  


दरम्यान, जिल्ह्यातील शिराळामध्ये वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय 34, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. प्रमोद यांचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेलं नाही. प्रमोद यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले असून, ते अनुकंपाखाली भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. श्रीराम कॉलनीमध्ये राहणारे चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी यांच्या बेडरुममध्ये पंख्याला कडी होती. नायलॉन दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. याबाबत घर मालक दयानंद घोडके यांनी फिर्याद दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या :