सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक तब्बल 17 महिन्यांनी जेलमधून सुटले आहेत. मात्र, पक्षाची दोन शकले झाली असल्याने नेमका कोणता झेंडा हाती घेऊ? अशाच अवस्थेत असल्याने त्यांनी आपला पत्ता उघड केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तर फुटीर अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मालिकांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य आणि त्यानंतर राजकारण असल्याचे पाटील म्हणाले.


सध्या तरी कोणत्याही स्वरुपाची तसदी देणार नाही


जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांना राजकारणात अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी कोणत्याही स्वरुपाची तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाल्याचे आम्हाला समाधान आहे. त्यांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य व त्यानंतर राजकारणाचे पाहू. नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


नवाब मलिक कोणता झेंडा हाती घेऊ स्थितीत


नवाब मलिक जेव्हा कोठडीत गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती, पण आता कोठडीतून बाहेर पडताना त्याच राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याची उत्सुकता आहे. सध्या दोन्ही गटाकडून संपर्क साधण्यात येत असला तरी नवाब मलीक यांच्याकडून मात्र आरोग्य सुधारण्याला महत्व दिले आहे. नवाब मलिक यांनी सध्या कोणत्याही गटाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकीय जामिनानंतर मलिकांची ईडीच्या अटकेतून सुटका झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. 


नवाब मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मलिकांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी राजकीय विषयावर चर्चा केली नसल्याचं पटेलांनी सांगितलं. एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून नवाब मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटीगाठी सुरु असतानाच मलिक कोणताही निर्णय घेणार नसून आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांना किडनी विकार असून त्यांची एक किडनी निकामी झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या