Sangli News : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. जाधव मळा येथील राज संजय जाधव (वय 23 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20 वर्षे) या नवदाम्पत्याने विषप्राशन (Poison) करुन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांचा विवाह गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. तासगाव पोलिसात (Tasgaon Police) या घटनेची नोंद झाली आहे.


मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह सुमारे 11 महिन्यांपूर्वी झाला होता. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.


विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं 


जाधव कुटुंबियांनी बुधवारी (28 जून) रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरुमकडे धाव घेतली. बेडरुमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे कोणतंतरी विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तातडीने या दोघांनाही खाजगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रुग्णालय इथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. 


या घटनेची माहिती मिळताच तासगांव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तासगाव पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.


हेही वाचा


Beed News : तीन महिन्यातच झाला प्रेमविवाहाचा दुर्देवी शेवट; सासू, पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं