Sangli News: संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त कृत्यांचा निषेध करण्यासाठी सर्व शिवशंभू प्रेमी, राष्ट्रप्रेमी, प्रगतशील पक्ष व संघटना यांनी आज (4 ऑगस्ट) इस्लामपूर बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये दलित महासंघ, संभाजी ब्रिगेड, विद्रोही चळवळ, शिवशंभो प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महासंघ, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले विचार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,भारतीय क्रांति दल या संघटना सहभागी झाल्या आहेत.
संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बहुजनांच्या प्रतिकांचे भंजन, ऐतिहासिक महापुरुषांचे मोठ्या प्रमाणात चारित्र्यहनन सुरू आहे. त्याची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या बदनामीपासून झाली. संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय, संत साईबाबा यांच्या विचारांच्या मोडतोडीचे व बदनामीचे षड्यंत्र रचले जात आहे. काही दशकांपासून खरे नाव लपवून बहुजनांच्या तरुण मुलांना फसवणाऱ्या संभाजी भिडे यांनी अलीकडेच महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा, स्वातंत्र्य दिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज याबाबत बुद्धिभेद करणारी व अवमानकारक विधाने केली आहेत. त्यामुळे भिडे यांच्या देशविघातक कृत्यांचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील पक्ष व संघटनांनी इस्लामपूर बंदची हाक दिली आहे.
संभाजी भिडेंना सांगली जिल्ह्यातूनही कडाडून विरोध
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच लावलेल्या संभाजी भिंडेंना आता सांगली जिल्ह्यातूनही कडाडून विरोध होऊ लागला आहे. जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरुडमध्ये संभाजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रखर विरोध झाल्याने गावाबाहेर संभाजी भिडे यांना बैठक घेण्याची वेळ आली. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरुड या गावी, एका मंगल कार्यालयात 2 ऑगस्ट रोजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.
शिराळा तालुक्यातील शिवशंभू प्रेमी, राष्ट्रप्रेमी, प्रगतशील पक्ष व संघटना यांनी 31 जुलै रोजी एकमुखी भिडेंना कडाडून विरोध करत सदर बैठकीस परवानगी नाकारण्याची मागणी शिराळा तहसिलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कोकरुड यांच्याकडे केली होती. संघटनांनी संयुक्तपणे प्रशासनास निवेदन देत तसेच शासकीय विश्रामगृह, शिराळा येथे जाहीर पत्रकार परिषद घेत भिडे यांच्या कोकरुड येथील कार्यक्रमास विरोध केला होता. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभरात क्लुषित झालेलं वातावरण आणि शिराळा तालुक्यातील शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन, तालुका प्रशासनाने भिडे यांच्या कोकरुड येथील नियोजित बैठकीस व कार्यक्रमास परवानगी नाकारली.
इतर महत्वाच्या बातम्या