Sangli News : गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच लावलेल्या संभाजी भिंडेंना आता सांगली जिल्ह्यातूनही (Sangli News) कडाडून विरोध होऊ लागला आहे. जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरुडमध्ये संभाजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रखर विरोध झाल्याने गावाबाहेर संभाजी भिडे यांची बैठक पार पडली. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरुड या गावी, एका मंगल कार्यालयात 2 ऑगस्ट रोजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.
शिराळा तालुक्यातील शिवशंभू प्रेमी, राष्ट्रप्रेमी, प्रगतशील पक्ष व संघटना यांनी 31 जुलै रोजी एकमुखी भिडेंना कडाडून विरोध करत सदर बैठकीस परवानगी नाकारण्याची मागणी शिराळा तहसिलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कोकरुड यांच्याकडे केली होती. संघटनांनी संयुक्तपणे प्रशासनास निवेदन देत तसेच शासकीय विश्रामगृह, शिराळा येथे जाहीर पत्रकार परिषद घेत भिडे यांच्या कोकरुड येथील कार्यक्रमास विरोध केला होता.
भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभरात क्लुषित झालेलं वातावरण आणि शिराळा तालुक्यातील शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन, तालुका प्रशासनाने भिडे यांच्या कोकरुड येथील नियोजित बैठकीस व कार्यक्रमास परवानगी नाकारली. कोकरुड येथील स्थानिक मंडळींनीही भिडे यांच्या या कार्यक्रमास विरोध केला होता. त्यामुळे कोकरुड हद्दीतील सर्व कार्यक्रम व बैठक प्रतिबंधित करण्यात आले. त्यामुळे भिडे यांची खासगी बैठक गावाबाहेर पार पडली.
पुरोगामी संघटनांकडून राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा
संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पुरोगामी संघटना 13 ऑगस्टपासून आंदोलनाची चळवळ सुरू करणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी सांगलीमधील महात्मा गांधी पुतळ्यासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा करत विषारी आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्टपासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतल्या आंदोलनाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संभाजी भिडे आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्याकडून थोर महापुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक पार पडली. जेष्ठ विचारवंत भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. विषारी आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्ट पासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीमध्ये पार पडली.
इतर महत्वाच्या बातम्या