Sangli News: द्राक्ष उत्पादकांच्या न्याय मागण्यांसाठी तसेच बेदाणा उत्पादन शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बेदाणा उत्पादक शेतकरी गळ्यात बेदाण्यांच्या माळा घालून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक देताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली.
द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक संकटात सापडला आहे. स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करत रस्त्यावरील वाहनधारकांना फुकट बेदाण्याचे वाटप करून शासनाचा निषेध करण्यात आला.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकरी एक लाख अनुदान, बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला प्रती टन एक लाख अनुदान मिळावे, द्राक्ष आणि बेदाणा खप कमी झाल्याने ही समस्या उद्भभवत आहे, त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा खाणे कसे हितकारक आहे याची ब्रँड हिरो घेवून पणन महामंडळाने टीव्हीवर जाहिरात सुरु करावी, गंडा टाळण्यासाठी दलालांना परवाना सक्तीचा करावा तसेच गंडा घालणाऱ्याना अटक करण्यासाठी राज्यव्यापी पोलिस पथक तयार करावे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करावा, बेदाणा उधळण १०० टक्के बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
तसेच बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, बेदाणा पेमेंट 21 दिवसात द्यावे. त्यानंतर दिल्यास दोन टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे. कीटकनाशकाच्या किमती कमी कराव्यात त्यावरील जीएसटी कमी करावा. शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा. बेदाणा पणन नियमनात आणावा आदींसह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, राज्यात सांगली जिल्हा हा द्राक्ष व बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून म्हणून ओळखला जातो. यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. चार किलोची पेटी 70 ते 100 रुपयांना विकली गेली. द्राक्षालाही यंदा फारच कमी दर मिळाला आहे. चिरमुरे 140 रुपये किलो आणि द्राक्षे 25 ते 30 रुपये किलो अशी स्थिती आहे. द्राक्षाला दर नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला, पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे. दरवर्षी 18 ते 20 हजार गाडी बेदाणा उत्पादन होते, पण चालूवर्षी ते 30 हजार गाडी पर्यंत गेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या