Sangli Accident : अवघ्या दोन दिवसांपूर्वी मिरजपासून सुरु झालेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर चालकाच्या बेदरकारपणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला. या अपघातात सरवडेमधील जयवंत पवार (वय 45 वर्षे) सोहम पवार (वय 12 वर्षे), कोमल शिंदे (वय 60 वर्षे), लखन शिंदे (वय 60 वर्षे) आणि बोलेरो चालकाचा जागीच अंत झाला. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामधील शिंदे दाम्पत्य हे जयवंत पवार यांचे सासू सासरे आहेत. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 


मिरजजवळील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूरच्या दिशेने देवदर्शनासाठी चाललेली बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. आज (17 मे) जयवंत पवार पत्नी, दोन मुले आणि सासू सासऱ्यांसह पंढरपूला देवदर्शनासाठी सरवडेतून गाडी भाड्याने करुन निघाले होते. त्यांनी राधानगरी तालुक्यातील शेळेवाडीमधील बोलेरी गाडी (MH-09-DA-4912) देवदर्शनासाठी बुक केली होती. 


कसा झाला अपघात?


बोलेरो पंढरपूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला समोरुन धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरुन पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावामधील आहेत. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर माहमार्गावर वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहोचली असता राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. यावेळी भरधाव असणारी बोलेरो समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवली. अपघाताची माहिती समजताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.


अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांना धक्का


दरम्यान, सकाळी देवदर्शनासाठी निघालेल्या पवार कुटुंबाचा मिरजेत भीषण अपघात झाल्याचे समजताच सरवडेमधील गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसला. या घटनेनंतर गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. अपघातग्रस्त पवार कुटुंबीयांचे नातेवाईक सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे ज्या ठिकाणी अपघात झाला तो टप्पा दोन दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपघात झाला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या