Sangli News: सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर (Vinayak Aundhkar) काल (16 मे) तब्बल दोन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले होते. लाचखोरांची मग्रुरी दिवसागणिक वाढत चालली आहे. विटा शहरात लाचखोर मुख्याधिकाऱ्यांविरोधात संतप्त पडसाद उमटले. विटा नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी गोमूत्र शिंपडून नगरपालिका स्वच्छ करत या झालेल्या कारवाईचे स्वागत केले.  


दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले


सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau) विनायक औंधकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. औधकर यांनी बांधकाम ठेकेदाराकडून इमारत बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील दोन लाखांची लाच घेताना विटा नगरपालिकेचे औधकर याना रंगेहात पकडण्यात आले. तीन महिन्यांपूर्वीच विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी औधकर यांची नियुक्ती झाली होती. विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार लाचलूचपत विभागाकडून मंगळवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. 


तीन महिन्यांपूर्वी विटा नगरपालिकेत रुजू


तीन महिन्यांपूर्वी विनायक औंधकर यांची विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. विट्यात येण्यापूर्वी ते सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विटा नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त ठरली. घटनेमुळे विटा नगरपालिकेसह सांगली जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


लाचखोर विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी दोन लाखांची लाच घेताना सापडल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची आता कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीत त्यांचा काळाबाजार बाहेर येण्याची शक्यता आहे. औंधकरांना रंगेहाथ पकडल्याने बांधकाम व्यवसायिक आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. विटामध्ये येऊन त्यांना तीन महिन्यांचा कालावधी झाला असला, तरी ते यापूर्वी कराडमध्ये कार्यरत होते. आता या ठिकाणी केलेल्या कारभाराची पण चौकशी होणार का? याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या लाचेचा आकडा दिवसागणिक वाढतच चालल्याने सामान्यांचा संताप वाढत चालला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या