सांगली  : दसऱ्याच्या (Dasara 2023)  सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही  दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ (Sangli News)  तालुक्यातील बंडगरवाडीत घडली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी  सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.


तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली. करोली टी येथील राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांना त्यांचे धुणे दिसले, मात्र जवळपास कोणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. सांगलीच्या भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम रेस्क्यू टीमचे, गजानन नरळे, एच ईआर एफ महेश कुमारमठ, फिरोज शेख, अनिल कोळी, योगेश मेंढीगिरी, सय्यद राजेवाले, नीलेश शिंदे यांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिस कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. . ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे. 


आईच्या डोळ्यादेखत तिन्ही भावंडं बुडाली, एकाच चितेवर अंत्यसंस्कार 


जामखेड (Jamkhed) तालुक्यातील खर्डा गावालगत असलेल्या अंतरवाली येथील एका पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू (Drowned) झाला. या तिन्ही पोरांना वाचवण्यासाठी आईनेही स्वत: तलावात उडी मारली. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंच्या धाडसाने मुलाच्या आईचे प्राण वाचवण्यात यश आले. आपल्या आईसह ही तीनही मुलं कपडे धुण्यासाठी तलावाकडे आली होती. मात्र कपडे धुवत असताना सानिया पाय घसरून तलावातील पाण्यात पडली. सानिया पाण्यात बुडू लागल्याचे पाहतात दीपक, कृष्णा दोघेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र काही कळायचे आतच तिघेही बुडू लागले. हे पाहताच त्यांची आई रुपाली तिनेही पाण्यात उडी मारली, मात्र ती देखील पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी आईने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांकडे वाचविण्यासाठी धावा केला. रस्त्यावरून जाणाऱ्या भूम तालुक्यातील गिरल गाव येथील सरपंच बिभीषण वाघमोडे, चांद पठाण आणि भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांनी तलावाकडे धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या.