Sangli News : शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेवरील व्याजाची रक्कम दिली नसल्याने सांगलीमधील वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीच्या संचालकांना जामिनासह हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत कंपनीच्या संचालकांना 28 जून रोजी जामिनासह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी म्हटले आहे. 


मिरजेतील शेतकरी मिलिंद खाडिलकर, गोपाळ खाडिलकर, महादेव कोरे, मकरंद खाडीलकर व सचिन कोरे यांनी याबाबत अॅड. अनिल कोपार्डे यांच्यामार्फत सांगली न्यायालयात दत्त इंडिया कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याचा भंग केल्याबद्दल फौजदारी तक्रार केली आहे. यावर प्रथमवर्ग दंडाधिकारी वहाब सय्यद यांनी याबाबत कंपनीच्या संचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमेवरील सुमारे 25 हजार रुपये व्याजाची रक्कम न दिल्याने दत्त  इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालक जितेंद्र धारू, प्रिया रुपारे मृत्युंजय शिंदे व शरद मोरे यांना न्यायालयाने ऊस नियंत्रण कायद्याच्या भंगाची नोटीस बजावली आहे. 


कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असणारी एफआरपी कारखान्यांकडून देण्यात येत नसल्याने शेतकरी संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये आता राज्यातील ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. सांगलीच्या वसंतदादा पाटील संचलित दत्त इंडिया साखर कारखान्याच्या संचालकांवर एफआरपी प्रकरणी गुन्हे दाखल करून संबंधित शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश सांगली न्यायालयाने बजावले आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. 


देशामध्ये एक रक्कम ऊसाची एफआरपी देण्याबाबतचा कायदा आहे. मात्र, 14 दिवसात एफआरपी देण्यात येत नाही. तुकडे करून तेही उशिराने देण्यात येतात, त्यामुळे शेतकरी संघटनेच्यावतीने दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या विरोधात सांगलीच्या न्यायालयामध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी सांगली न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि राज्यातला पहिलाच निकाल दिला आहे. यामध्ये दत्त इंडियाचे प्रोप्रायटर आणि संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन संबंधित उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या