Prithviraj Chavan On Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीत नेतृत्वावरून खल सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साशंकता व्यक्त करताना पक्षातील वादाकडे लक्ष वेधले आहे. पवार साहेब यांनी पक्षातील वादामुळे त्रागा करून राजीनामा दिला आहे का? हे देखील पहावं लागेल? अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. 


राजीनाम्याचा अजून अंतिम अध्याय लिहिलेला नाही


पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादीमधील राजकीय वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांनी निर्णय घेतला, पण कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मग कोण जबाबदारी घेणार हे देखील पहावं लागेल. राजीनाम्याचा अजून अंतिम अध्याय लिहिलेला नाही. पवार साहेबांनी राजीनामा दिला, तर सुप्रियाताई, अजित पवार असे अनेक पर्याय आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळणारा नेता हा खासदार असावा लागतो. त्यामुळे सुप्रियाताई यांच्याच नावाचा विचार होऊ शकतो. चव्हाण पुढे म्हणाले की, पवार साहेब यांनी पक्षातील वादामुळे त्रागा करून राजीनामा दिला आहे का? हे देखील पहावं लागेल.  


म्हणून भाजपकडून काही प्रयत्न सुरू


शरद पवार यांना कुणी शिल्पकार म्हटलं कुणी काय म्हटलं पण काँग्रेस आल्याशिवाय ही महाविकास आघाडी होऊ शकली नसती. महाविकास आघाडीला फोडल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. म्हणून भाजपकडून काही प्रयत्न सुरू आहेत, पण आम्ही तिन्ही पक्ष भाजप विरोधात भूमिका घेऊन एकत्र आलो आहोत. तिन्ही पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेसने 40 उमेदवार उभा केले


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एका बाजूला आपण भाजपला बाजूला ठेवण्यासाठी एकत्र आलो तर कर्नाटकात भाजपला मदत होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसने 40 उमेदवार उभा केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचं समोर आलं. त्यामुळं कोण कुठं राहत याचा नेम लागणार नाही असं मी निपाणीत म्हणालो होतो. काँग्रेस कधीही भाजप सोबत जाणार नाही, शिवसेना तर आता जाणार नाही त्यामुळे राष्ट्रवादीबद्दल बोललं जातं, पण आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत तोपर्यंत महाविकास आघाडीला काही धोका नाही. 


आम्ही कोणतीही अडचण निर्माण केली नाही


दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस ताकदीनं उतरली नाही हे काही अर्थी खर देखील आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना दोन पक्ष प्रादेशिक होते. त्यामुळे आम्हाला देशभरातील अनेक नेत्यांशी चर्चा गरजेची होती. त्यामुळे काँग्रेसने आढेवेढे घेतले हा आरोप त्यातून केला असेल, पण आम्ही कोणतीही अडचण निर्माण केली नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या बैठकीवेळी पवार साहेब नाराज झाले होते हे खरं आहे, पण भाजपचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात येऊ द्यायचे नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला. 


इतर महत्वाच्या बातम्या :