सांगली:  सांगलीत (Sangli News)  नीट परीक्षेदरम्यान (Neet Exam)  एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे.  कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र  उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले.  अशी तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली.  त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे  तक्रार केली आहे. 


 देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. या परीक्षा पार पडत असताना सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.  परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी  त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केलाय. या परीक्षा केंद्रात  येणाऱ्या विद्यार्थिनींचे तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.  विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे. परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.  त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला  आहे. 


पालकांकडून संताप व्यक्त


दरम्यान घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.  अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना उलटे कपडे घालायला लावणं हे कितपत योग्य आहे? आणि ते कोणत्या चौकटीत बसतं?   शिवाय कपडे बदलताना मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली? असे अनेक प्रश्न  उपस्थित झाले आहे.


महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण


दरम्यान सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण  देण्यात येत आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.


परीक्षार्थींना मानसिक त्रास झाला


परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला. सर्व महिला परीक्षार्थींना कठोर ड्रेस कोडच्या नावाखाली त्यांचे कपडे उलटे घालायला लावले. याचा परीक्षार्थींना मानसिक त्रास तर झालाच, पण हे चुकीचे असल्याचेही बोलले जात आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता सगळीकडे टीकेची झोड उठली आहे.