Sangli News: सांगलीमधील (Sangli News) इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पक्ष कार्यालयावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (21 जून) या कार्यालयासमोर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीने हे कार्यालय सोडून काँग्रेसच्या ताब्यात द्यावे, असा इशारा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला. चार दिवसांत या बाबतीत राष्ट्रवादीने निर्णय घेतला नाही, तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसू, असा इशारा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला. काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीत 24 वर्षांपासून राष्ट्रवादीचे कार्यालय भरते, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे.
महिन्याभरापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इस्लामपूरमध्ये घेतलेल्या एका मेळाव्यात काँगेस आणि राष्ट्रवादीमध्ये या कार्यालयावरुन वाद असल्याचे समोर आले होते. मात्र, महिनाभर राष्ट्रवादीकडून कार्यालय सोडण्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने आता या जागेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्लामपूरमधील याच कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन काँग्रेसचे कार्यालय काँग्रेसच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली.
दरम्यान, विटा आणि तासगावमधील काँग्रेस कमिटी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र, इस्लामपुरातील काँग्रेस कमिटी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती काँग्रेसच्या ताब्यात मिळावी, अशी आता काँग्रेसचे पदाधिकारी मागणी करत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीचा ताबा घेतलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर समोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यामुळे या कार्यालयाबाबत जयंत पाटीलच बोलतील अशी या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे.
नाना पटोलेंनी घेतलेल्या मेळाव्यात निघाला मुद्दा
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा एक मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाचा ताबा सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
24 वर्षांपासून काँग्रेस कार्यालय राष्ट्रवादीच्या ताब्यात
काँग्रेसमधून फुटून 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळी आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष कार्यालयातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरु आहे. तब्बल 24 वर्षे तालुका काँग्रेस कमिटीच्या जागेवर ताबा घेऊन राष्ट्रवादी कार्यालय वापरत आहे.
इस्लामपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी वाद?
नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या इस्लामपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इस्लामपूर भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. दुसरीकडे, याच मेळाव्यात 24 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले कार्यालय परत काँग्रेसला मिळावे, अशी मागणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे स्थानिक राजकारणातून काँग्रेस विरुद्ध जयंत पाटील असा वाद सांगलीच्या राजकारणात वाढत चालला आहे का? अशीही चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या