Sangli Crime : जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाने भावाचा खून केल्याची घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात घडली आहे. मिरज (Miraj) तालुक्यातील बेडगमध्ये सोमवारी (19 जून) रात्री आठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली. हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बंडू शंकर खरात (वय 50 वर्षे )असं मृताचं नाव आहे तर सचिन बबन खरात (वय 30 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे.
जमिनीचा वाद विकोपाला गेला अन्....
मिरज तालुक्यातील मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती इथे ही घटना घडली. आरोपी सचिन खरातने बंडू खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घातले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. या खुनात वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. बंडू खरात यांचा चुलत भाऊ सचिन खरात यांच्याशी जमिनीचा वाद सुरु होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यवसान खुनामध्ये झालं.
बेडगमध्ये महिन्याभरातील दुसरा खून
मिरज तालुक्यातील बेडगमध्ये महिन्याभरातील हा दुसरा खून आहे. बेडगमध्ये एकापाठोपाठ एक खुनाचे प्रकार घडत आहेत. एका महिन्यातच दुसरा असा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारल्याची घटना नुकतीच घडली होती.
मुलाने वडिलांना ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडलं
बेडग इथे 24 मे रोजी जमिनीच्याच वादातून मुलाने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारल्याची घटना घडली होती. दाजी गजानन आकळे (वय 70 वर्षे रा. मालगाव रस्ता, बेडग) यांना मुलगा लक्ष्मण आकळेने ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मालगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित लक्ष्मण याला तातडीने ताब्यात घेतलं. मृत दाजी आकळे आणि संशयित मुलगा लक्ष्मण आकळे हे पिता-पुत्र होते आणि दोघांमध्ये वाद होता. तसंच दाजी आकळे यांनी दिलेल्या पैशांची मागणी मुलाकडे केली होती. लक्ष्मणने वडिलांकडे पैसे आणि शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, दाजी आकळे हे पैसे देण्यास अथवा जमीन नावावर करुन देण्यास राजी नव्हते. यातून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. यातूनच चिडलेल्या लक्ष्मणने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं.
हेही वाचा