Sangli News: सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यातील बेडगमध्ये आंबडेकरी समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एक महिन्यांपूर्वी गावात उभारण्यात येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतकडून पाडण्यात आले. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध दलित समाज असा विरोध सुरु झाला होता. मात्र, प्रशासनाकडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्याय मिळत नाही या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आता आंबडेकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत गाव सोडले आहे. कमानीचे खांब पाडणाऱ्यांवर कारवाई न करण्यात आल्याने गावातील आंबेडकरी समाजातील जवळपास 125 कुटुंबातील 800 लोकांनी गाव सोडलं आहे. 


मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार 


कमान उभारण्याचे काम सुरु असताना अचानक ग्रामपंचायतीने कमानीचे खांब पाडल्याने कमान उभारणारा आंबडेकरी समाज आक्रमक झाला आणि कमानीचे खांब पाडणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांवर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील केली. मात्र, प्रशासनाने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बेडग गावातील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह आणि अंथरुण-पांघरुण, कपडे, भांडीकुंडी, जनावरे आदी संसारोपयोगी साहित्य घेत गाव सोडले आहे. जिल्हा प्रशासनाने कमानीचे खांब पाडलेल्यांवर कारवाई न केल्याने याच्या निषेधार्थ आणि न्याय मागणीसाठी आता हे सगळे आंबेडकरप्रेमी पायी चालत मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आणि न्याय मागणार आहे, असं या मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या डॉ. महेशकुमार कांबळे यांनी सांगितले. 


दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना या मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काल रात्री याबाबत बैठक घेतली होती. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने हे मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र, 16 जून रोजी कमान बेकादेशीर असल्याचं ठरवत ग्रामपंचायतानी बांधकाम सुरु असलेली कमानीचे खांब पाडून टाकले. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकरवाद्यांनी याला विरोध केला होता. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या