Kolhapur Crime: कोल्हापूर आणि सांगलीत चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सांगलीमधील इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली. बँकेच्या समोरून नागरिकांच्या पैशाची बॅग पळवणाऱ्या ओडिशामधील आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडील 4 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 


नानी सिबा नागरोळ (वय 40), एम. रायडू (20), संतोष रामू औल (25, तिघेही रा. पाकलापल्ली, असका, जि. गंजम, राज्य ओडिसा), रोहित गोपाल प्रधान (22, कलिंकनगर, मंत्र्याळ, जि. झांजपूर रोड, राज्य ओडिशा) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांवर यापूर्वी इस्लामपूर, शिराळा, कागल तसेच कोडोली पोलिस ठाण्यांमध्ये अशा स्वरूपाच्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेली माहितीनुसार 10 जुलै रोजी सुभाष गोपाळ पाटील (शाहूनगर, इस्लामपूर) हे आझाद चौकातील एका बँकेच्या इस्लामपूर शाखेतून 50 हजार रुपये काढून बाहेर आले. कापडी पिशवीत ती रक्कम गुंडाळून सायकलच्या कॅरेजला लावली. घरी जात असताना मोटारसायकलवरील अनोळखीने त्यांच्या आडवी गाडी मारली व त्याचदरम्यान पाठीमागील एका अनोळखीने पिशवी काढून घेऊन ते दोघे मोटारसायकलवरून पळून गेले. सुभाष पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली होती.


पोलीस तपासात हे चोर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील पेठवडगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 3, शिराळा, कोडोली, गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी 1, तसेच कागल येथील 2 गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील 4 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडील दोन दुचाकी, तीन मोबाईल, रोख रक्कम एक लाख ३० हजार तसेच तेलंगणामधील एकाचे डेबिट कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहे.


ओडिशामधील चौघेही हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे भाड्याच्या खोलीत सात महिने राहत आहेत. शेजारच्या एका कंपनीत कामाला जात असल्याचा बनाव त्यांनी केला होता. त्यामुळे आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या