Sangli Crime: मुलाने बापाचा खून केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोपर्यंत आणखी एक थरकाप उडवणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. दारुड्या मुलाला कंटाळून बापानेच कुऱ्हाडीने खून करून नंतर मृतदेहाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले आणि ते तलावात फेकल्याची घटना मिरजमध्ये घडली. राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड (वय 50, रा. गणेश तलाव लक्ष्मी मंदिर, मिरज) असे निर्दयी बापाचे नाव आहे. रोहित राजेंद्र हांडीफोड (वय 30) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. 


खून करून वडिल मिरज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचे समजल्यानंतर मिरज शहरात खळबळ उडाली. बापाने मिरज शहर पोलिसांत हजर होऊन खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली. सुभाष नगर शिंदे हॉलजवळ राजेंद्र हंडीफोडचा मालकीचा प्लॉट आहे. या ठिकाणी राजेंद्रने मुलगा रोहितचा खून करून तुकडे करून पोत्यात भरले आणि काही शरीराचे तुकडे गणेश तलाव येथे आणून टाकले. रोहितला दारु आणि जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे व्यसनासाठी रोहित कुटूंबाला त्रास देत असल्याने बापाने कायमचा काटा काढण्यासाठी खून केला. या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता.


शेत जमीन, घर नावावर करत नाही म्हणून मुलाने केला वडिलांचा खून


दरम्यान, कडेगाव तालुक्यातील विहापूरमध्ये शेत जमीन आणि घर नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत वडील तानाजी माने विहापूरमध्ये शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलगा प्रदीपला दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसापासून त्याने वडील तानाजी यांच्याकडे शेत जमीन व घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने तानाजी हे मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. याचा राग प्रदीपच्या मनात होता. याच रागातून प्रदीप हा शनिवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पुन्हा वडील आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यातून प्रदीपने वडील तानाजी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फरशीवर आपटून ठेचले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना सांगलीमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तानाजी माने यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा प्रदीप मानेला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :