Sangli Crime : माता न तू वैरिणी याचा प्रत्यय सांगली (Sangli) जिल्ह्यात आला. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला महिलेने आपल्या प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने संपवलं. आधी चिमुकल्याचं अपहरण (Kidnap) झाल्याचा बनाव केला. नंतर प्रियकराच्या मदतीने मुलाला विहिरीत फेकून दिलं. ही घटना खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात घडली आहे. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी (Vita Police) कसून तपास करुन या घटनेमागील खरा प्रकार उघडकीस आणला. विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28 वर्षे, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25 वर्षे, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. 


मुलगा अडथळा वाटत असल्याने निर्दयीपणे काटा काढला


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रुपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हिचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. मात्र ज्योती आपल्या नवऱ्यासोबत राहत नसून त्या दोघांनी घटस्फोटची घेण्याची प्रक्रिया देखील  सुरु केली होती. ज्योती आणि रुपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतु या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयीपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. 


एकीकडे शौर्यचं अपहरण झाल्याची तक्रार, दुसरीकडे विहिरीत फेकलं


सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आई म्हणजे ज्योती लोंढेने दिली. तर इकडे रुपेशने शौर्यला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलीस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.


विटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि...


दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रुपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरु आहे. या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.


करणी केल्याच्या संशयातून मायलेकीची हत्या


सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधील कुणीकुणुर गावामध्ये काही दिवसांपूर्वी मायलेकीचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला आहे. प्रियंका बेळूखे (वय 32 वर्षे) आणि त्यांची मुलगी मोहिनी बेळूखे (वय 14 वर्षे) असे मृत मायलेकीचे नाव आहे. करणी केल्याच्या संशयातून चुलत दिराकडून मायलेकीची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं.


हेही वाचा


Sangli Crime : सांगलीमधील माय लेकीच्या हत्याकांडाचा उलगडा; करणी केल्याच्या संशयातून चुलत दिरांकडून निर्घृण हत्या