Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाच दिवसांपूर्वी उमदीजवळ कुणीकोनूरमध्ये झालेल्या मायलेकींच्या हत्येमध्ये धक्कादायक उलगडा झाला आहे. करणी केल्याच्या संशयातून तिघा दिरांनी मिळून मायलेकींची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. उमदी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अजून एकजण फरार आहे. 


पाच दिवसांपूर्वी, प्रियांका बेंळूखे (वय 32) आणि  मोहिनी बेंळूखे (वय 14) या मायलेकींचा 24 एप्रिल रोजी गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी पतीने खून केल्याच्या संशयातून आणि तक्रारीनंतर पती बिराप्पा बेंळूखेला अटक केली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये चुलत दिरांकडून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास मारुती बेळुंखे आणि अक्षय रामदास बेळुंखे अशी संशयितांची नावे आहेत.  


दरम्यान, मयत प्रियांकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना तपास करत असतानाच बेंळूखे भावकीमधील तिघांवर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित विकास व अक्षयवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता करणीच्या संशयातून मायलेकींचा खून केल्याची कबूली दिली. रविवारी पाणी पिण्याच्या बहाण्याने मयत प्रियांकाच्या घरी आरोपी विकास व अक्षय गेले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांचा अन्य एक मित्रही होता. प्रियाकाचा विकासने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईची ओरड सुरू झाल्याने मुलगी मोहिनी आईकडे धावल्यानंतर तिचाही आरोपींनी गळा दाबून खून केला. यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून अक्षय हा अंत्यविधी करतानाही हजर होता. काही घडले नसल्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर खुनाची कबूली दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या