सांगली: बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिरज मधील अहद शेखने तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची धक्कादायक माहिती सांगली पोलिसांच्या (Sangli Police) तपासात समोर आली आहे. 50 रुपयांच्या हुबेहूब भारतीय चलनी नोटाप्रमाणे बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद महंमद अली शेख (वय 44, रा. शनिवार पेठ, मिरज) याला पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली होती. अहदकडे (Ahad Shaikh) केलेल्या चौकशीत त्याने आज अखेर सुमारे 40 लाखांच्या बनावट नोटा (Fake Currency) चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तसेच अहदकडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक बनावट नोटा विक्रीसाठी आला असताना अहदला सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याच्या झडतीमध्ये 50 रुपयांच्या बनावट 75 नोटा आढळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी तेथे छापा टाकला. 50 रुपयांच्या एक लाख ९० हजारांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद (Note printing Machine), शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा एकूण 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अहद शेख याला तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात त्याने जवळपास एक वर्षापासून बनावट नोटा (Fake Notes) छापण्यास सुरुवात केली होती अशी माहिती दिलीय.
आतापर्यंत 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पुढे आली. अहदच्या या कारनाम्यामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय. 70 रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता संबंधित एजंटचा शोधही घेतला जात आहे. मात्र, या बातमीने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात आता नेमक्या किती बनावट नोटा फिरत असाव्यात, याबाबत तपास सुरु आहे.
आणखी वाचा
युट्यूबवर पाहून घरातच छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी नापास 26 वर्षीय तरुणाला बेड्या