नवी मुंबई : बनावट नोटा बनवून बाजारात आणणाऱ्या रॅकेटचा यापूर्वीच पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला होता. मात्र, आता नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका 36 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने युट्युबवर (Youtube) पाहुन आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी (Police) त्याच्या घरातून 2 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपी प्रफुल्ल पाटील ह्याच्या घरामध्ये 2 लाख 3 हजार 200 रुपयांच्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जफ्त केल्या आहेत.
नवी मुंबईतील प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली होती. याद्वारे त्याने 10, 20, 50, 100 व 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरातआणल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील तीन चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटील याने अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे त्याने आत्तापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या, तसेच या नोटा बाजारात कुठे-कुठे वापरल्या याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून तळोजा एमआयडीसी परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील (26) यास ताब्यात घेतले. या झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा आढळल्या असून त्याच्या घराची पाहणी केल्यावर त्याने सुरू केलेला बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला आहे. तसेच, प्रफुल्लने छापलेल्या 2 लाख रुपये किंमतीच्या 1,443 बनावट नोटादेखील सापडल्या. त्यामध्ये पन्नासच्या 574, शंभरच्या 33 आणि दोनशेच्या 856 बनावट नोटांचा समावेश आहे. दरम्यान, केवळ 26 वर्षीय तरुणाने युट्बूवर पाहून बनावट नोटा बनवल्याने पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. आता, घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा
आधी उमेदवारी चोरली, आता कार्यकर्त्यांकडून मारहाण; कल्याणमध्ये वंचितच्या मिलिंद कांबळेंसोबत मोठा गेम