Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्यात काल (24 मे) एकाच दिवशी खुनाच्या (Murder) तीन घटना घडल्या. यामध्ये मिरज (Miraj) तालुक्यात दोन तर कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यात एकाचा खून झाला. एकाच दिवशी आणि लगतच्या तालुक्यात तीन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिरज तालुक्यातील एरंडोली गावी पत्नीने पतीचा चाकूने भोसकून खून केला तर बेडग गावी मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारल्याचा प्रकार घडला. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील बिरोबा बनाच्या हॉटेलमध्ये वेटरनेच किरकोळ कारणातून दुसऱ्या वेटरच्या डोक्यात लाकडी फाळकूट घातले ज्यात तो जखमी झाला आणि उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
मुलाने ट्रॅक्टर अंगावर घालून वडिलांना चिरडले
काल बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेडग इथे घडलेल्या घटनेत दाजी गजानन आकळे (वय 70 वर्षे, रा. मालगाव रस्ता, बेडग) यांना त्यांच्या मुलाने लक्ष्मण आकळेने ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलीसांनी संशयित लक्ष्मणला तातडीने ताब्यात घेतले. मृत दाजी आकळे आणि लक्ष्मण या दोघांमध्ये वाद होता. तसंच दाजी आकळे यांनी मुलाकडे त्याने उसणे घेतलेल्या पैशांची मागणी केली. लक्ष्मणने वडिलांकडे पैसे आणि शेतजमीन नावावरुन करुन दे यासाठी असा तगादा लावला होता. मात्र, दाजी आकळे हे पैसे देण्यास अथवा जमीन नावावर करुन देण्यास राजी नव्हते. यातून दोघामध्ये सातत्याने वाद होत होता. यातूनच चिडलेल्या मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारले.
पत्नीने पतीवर चाकूने वार करुन खून केला
पती-पत्नीमध्ये जेवण करण्यावरुन झालेल्या वादात पत्नीने पतीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील एरंडोली इथल्या पारधी बेघर वस्तीवर घडली. या घटनेनंतर महिलेने पलायन केले. पारधी वस्तीवर राहणारा सुभेदार आनंदराव काळे (वय 45 वर्षे) आणि पत्नी चांदणी काळे यांच्यात जेवण करण्यावरुन वाद झाला. या वादात महिलेने चाकूने पतीच्या छातीवर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फरार झालेल्या महिलेच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितलं.
कवठेमहांकाळ इथल्या हॉटेलबाहेर झालेल्या मारहाणीत जखमी वेटरचा मृत्यू
कवठेमहांकाळ इथल्या बिरोबा बनातील हॉटेलबाहेर वेटरनेच दुसऱ्या वेटरच्या डोक्यात लाकडी फाळकूट घालून खून केला. सुरेश कडीमणी असं मृत वेटरचं नाव आहे. एका हॉटेलमध्ये प्रशांत उबे हा व्यक्ती तीन दिवसांपूर्वी कामावर आला होता. मंगळवारी रात्री जेवण देत असताना कडीमाणीने अंडे खायला घेतले. त्यावरुन प्रशांत उबेने (वय 45 वर्षे) दारुच्या नशेत कडीमणीच्या डोक्यात फाळकुटाने मारले. जखमी वेटर सुरेश कडीमणीचा मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. आरोपी प्रशांत उबे पसार झाला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा