Sangli Crime: गाडीवरील असलेला हेल्पलाईन नंबर का लागत नाही? या कारणावरुन भाजप नेत्याच्या मुलाला देशिंग कॉर्नर परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्याकडील एक हजार रुपयेही काढून घेण्यात आले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांचा मुलगा सारंग श्रीरंग केळकर (वय 26 वर्षे) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातील एक हजार रुपये काढून घेतले
ही घटना बुधवारी (31 मे) देशिंग रोडवर घडली. सारंग केळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदकुमार नामदेव कर्पे आणि अनिल गोरख भंडारे (रा.करोली (टी) ता.कवठेमहांकाळ) यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नीता केळकर यांचा मुलगा सारंग हा कामानिमित्त कंपनीची कार घेऊन देशिंग कॉर्नर येथील अंबिका गॅरेजमध्ये थांबले होते. त्यावेळी करोली (टी) येथील नंदकुमार कर्पे यांनी कंपनीच्या गाडीवर असलेला हेल्पलाईन नंबर बंद का आहे? असे विचारुन अनिल भंडारे यांच्यासोबत मिळून सारंग केळकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील एक हजार रुपये काढून घेतले.
घटनेची माहिती नीता केळकर यांना मिळताच त्या तात्काळ कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आल्या. पोलिसांनी नंदकुमार कर्पेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी अनिल भंडारे अद्याप फरार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे करत आहेत.
मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना 10 दिवसांपूर्वी घडली होती. या मुलाचा मृत्यू हा कर्नाटकातील एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाला होता. मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने तिच्या आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या