Sangli Crime: सांगली पोलीस दलातील (Sangli Police) एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला पोलिसाचा गर्भपातही केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली पोलीस दलातील बँड पथकातील संशयित वसीम ऐनापुरेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला सांगली पोलीस दलात कार्यरत आहे. सांगली पोलीस बँड पथकातील वसीम ऐनापुरेसोबत तिची ओळख होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून धमकी देणाऱ्या ऐनापुरेविरोधात फिर्याद दाखल होताच त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसिमच्या वडिलांनासुद्धा अटक करण्यात आली आहे.


लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार  


वसीमने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली. त्यानंतर वसिम याने पीडितेवर 4 मार्चपासून 6 जुलैपर्यंत सिंधुदूर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर आदी ठिकाणी नेत तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने बलात्कार केला. यामध्ये पीडित पोलीस महिला गर्भवती राहिली. पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीमने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर पीडितेने तक्रार करू नये यासाठी वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरुन धमकी देखील दिली असल्याची तक्रार पीडित पोलीस कर्मचारी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांचा अधिक तपास करत आहेत.


नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, वडिलांनीच केला खून


दरम्यान, सांगली जिल्ह्यात (Sangli News) ऑनर किंलीगची जुलै महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. मुलीच्या प्रेमप्रकरणास वडिलांनी विरोध करत निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये घडली. प्रेमप्रकरणास वडिलांचा असलेला विरोध आणि मुलगी सांगूनही ऐकत नाही, म्हणून चिडून वडिलांनीच खून केला. श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मयत मुलीचे नाव आहे. संतोष जगन्नाथ जाधव, असे श्रेयाच्या वडिलांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मयत श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. त्यामुळे 1 जुलै रोजी शनिवारी श्रेया कॉलेजला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र, वडिलांनी तिला संबंधित मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. यावरून वाद झाल्यानंतर वडिलांनी रागाच्या भरात खून केला. 


इतर महत्वाच्या बातम्या :